मम्मी-पप्पा, मी आता कुणाच्या आधारावर जगायचं...? साक्षीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश : पाटील दाम्पत्याच्या आत्महत्येने मुलगी निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:45+5:302021-04-18T04:23:45+5:30

कळे : मम्मी-पप्पा, मी असा कोणता गुन्हा केला होता... म्हणून तुम्ही मला एकटीलाच ...

Mommy and Daddy, on what basis do I want to live now ...? Witness's heart-wrenching outcry: Patil couple's suicide, daughter helpless | मम्मी-पप्पा, मी आता कुणाच्या आधारावर जगायचं...? साक्षीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश : पाटील दाम्पत्याच्या आत्महत्येने मुलगी निराधार

मम्मी-पप्पा, मी आता कुणाच्या आधारावर जगायचं...? साक्षीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश : पाटील दाम्पत्याच्या आत्महत्येने मुलगी निराधार

कळे : मम्मी-पप्पा, मी असा कोणता गुन्हा केला होता... म्हणून तुम्ही मला एकटीलाच सोडून गेलात? आता मी कोणाच्या आधारावर जगायचे?... असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश साक्षी दीपक पाटील करीत आहे. तिच्या हंबरड्याने कळेजवळील गोठे (ता. पन्हाळा) गाव गलबलून जात आहे. तिच्या आईवडिलांनी शुक्रवारी (दि. १६) मुलग्याला पोटाशी बांधून कुंभी नदीत आत्महत्या केली आहे. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शनिवारी दिवसभर पै-पाहुण्यांची रीघ होती; परंतु साक्षीने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर मात्र कुणाकडेच नव्हते. साक्षीच्या भावना आत्महत्येचा विचार करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणाऱ्या आहेत. मरणारे मरून गेले; परंतु साक्षीच्या वाट्याला मात्र आयुष्यभराचे पोरकेपण आले... समाज याचा विचार कधीतरी करणार आहे का?

दहावीत शिकणारी साक्षी सांगते, ‘ना पप्पा, ना मम्मी, ना भाऊ. मला माझं असं जवळचं आधार देणारं कोणीच राहिलं नाही. थोडा तरी माझा विचार करायचा. माझा राहू दे; पण निष्पाप, निर्व्याज मनाचा माझा लहान भाऊ विघ्नेशला पण तुम्ही सोबत घेऊन गेलात. त्यानं असा कोणता गुन्हा केला होता ? त्याचं आयुष्य अजून फुलायचं होतं. त्यानं अजून हे जग पाहिलंपण नव्हतं. दोन वर्षांपूर्वीच आजी आम्हाला सोडून गेली. त्यामुळे म्हातारपणी आजोबांना आधार तुम्हा दोघांचाच होता. त्यांचा सांभाळ दुसऱ्यांना करायला सांगून तुम्ही मात्र आपली जबाबदारी झटकून चुकीच्या मार्गाने निघून गेलात. असे निष्ठुर कृत्य करताना तुम्हाला आमच्या भविष्याची तर आजोबांच्या म्हातारपणाच्या आधाराची काळजी जरा पण का वाटली नाही?

मम्मी-पप्पा, तुम्हाला होत असणाऱ्या वेदना मला कळल्या असत्या तर मी मामाकडे चिंचवडेला गेले नसते. तुम्हा तिघांनाही घरातून बाहेरच सोडलं नसतं. पण काय करणार? माझं नशीबच फुटकं म्हणायचं...!‘असे ती भडाभडा बोलत राहते आणि सर्वांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत राहतात...

साक्षीच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह...

‘मम्मी-पप्पा, तुमचं विघ्नेशला प्राध्यापक तर मला शिक्षिका करायचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाचं काय झालं ते तर सांगा. असलं निष्ठुर कृत्य करून विघ्नेशचं स्वप्न तर धुळीस मिळवलंच; तुम्ही पण मलाही जगाच्या स्वाधीन करून गेलात. आता मी शिक्षिका होणे सोडूनच द्या. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण तरी पूर्ण होतंय की नाही हेच आता देवाला माहीत...’ समाजानेच आता साक्षीच्या शिक्षणासाठी पुढे यायला हवे..

फोटो : १७०४२०२१-कोल-साक्षी दीपक पाटील

Web Title: Mommy and Daddy, on what basis do I want to live now ...? Witness's heart-wrenching outcry: Patil couple's suicide, daughter helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.