मोदींची लाट दोन्ही काँग्रेस थोपवतील -- जोगेंद्र कवाडे
By Admin | Updated: August 12, 2014 23:51 IST2014-08-12T23:49:05+5:302014-08-12T23:51:51+5:30
जनशक्ती सन्मान मेळावा; विधानसभेसाठी काँग्रेसकडे २२ जागा मागणार

मोदींची लाट दोन्ही काँग्रेस थोपवतील -- जोगेंद्र कवाडे
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा भ्रमनिरास होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस मोदींची ही लाट थोपवल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (पीआरपी) राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे यांनी आज, मंगळवारी जनशक्ती सन्मान मेळाव्यात व्यक्त केले. यावेळी राज्यातील विधानसभेच्या २२ जागा काँग्रेसकडे मागणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. ‘पीआरपी’तर्फे शाहू स्मारक भवनात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. यावेळी आवाडे यांच्या हस्ते प्रा. कवाडे यांचा सत्कार करण्यात आला. कवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा होऊ घातली आहे. नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आले, तरी महागाई कमी झालेली नाही. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसबरोबर आघाडी आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागावाटपासंदर्भात बोलणी सुरू आहेत. कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्य मांडले. पण, भारतीय जनता पक्षाने हायटेक प्रचार करत यश मिळविले. त्यामुळे काँग्रेसने केलेल्या कामांची लोकजागृती झाली नाही. आता विधानसभेला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जनतेने दक्ष राहणे गरजेचे आहे. या शक्तींना रोखण्यासाठी व समतेचे राज्य आणण्यासाठी विचारांचे राज्य आणले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्र्ते हातात हात घालून काम करतील. जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, आर. बी. कोसंबी, विद्याधर कांबळे, अमृत कांबळे, शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, अस्मिता दिघे, विक्रम शिंगाडे यांच्यासह कार्यकर्र्ते उपस्थित होते. सर्जेराव माळवी यांनी आभार मानले.