मोदींनी बनवले पाच वर्षांसाठी ‘एप्रिल फूल’
By Admin | Updated: April 2, 2015 01:25 IST2015-04-02T01:22:16+5:302015-04-02T01:25:50+5:30
सोशल मीडियावर मेसेजेसची धूम : कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर हास्य

मोदींनी बनवले पाच वर्षांसाठी ‘एप्रिल फूल’
कोल्हापूर : मित्रांनो, आज कुणालाही एप्रिल फूल बनवू नका; कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यातच आपल्याला पाच वर्षांसाठी ‘एप्रिल फूल’ केले आहे, आजचा हा दिवस ‘जागतिक मोदी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी नेटिझन्सची मागणी, आता तर खरंच हद्द झाली बाबा, मला खरं सांगा की ही अफवा कोणी पसरवली की आपला अॅडमिन एप्रिलचे फूल शोधायला निघाला... अशा विविध विषयांचे विडंबन करत व्हॉट्स अॅपवर एप्रिल फूलचे संदेश पाठवत कोल्हापूरकरांनी बुधवार हास्याची लकेर कायम ठेवत घालविला.१ एप्रिल हा दिवस जवळच्या माणसांना काही ना काही कारण काढून उल्लू बनविण्याचा आणि त्यावर खळखळून हसण्याचा. आता प्रत्यक्षात समोरच्यांना किती मूर्खात काढले जाते, यापेक्षा आपण सगळे कसे मूर्ख बनलो आहोत हेच संदेश दिवसभर व्हॉट्स अॅपवर येत होते. या सगळ्यांत ‘अच्छे दिन’चे दिवा स्वप्न दाखविलेल्या पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. मोदींनी आपल्याला पाच वर्षांसाठी फूल केले आहे; त्यामुळे आता कोणालाही फूल बनविण्याची गरज नाही, आजचा दिवस जागतिक मोदी दिन म्हणून साजरा केला जावा अशा आशयाचे संदेश सगळीकडे फिरत होता.
आज पेपरमध्ये वाचले की, कोल्हापूर वाय-फाय सिटी होणार. नंतर कळले की आज १ एप्रिल आहे, १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ का म्हणतात, तर आपण वर्षभर गाढवासारखं राबून ३१ मार्चला कष्टाची कमाई सरकारच्या तिजोरीत टाकतो आणि १ एप्रिलपासून पुन्हा गाढवासारखं राबायला सुरुवात करतो असे संदेश येत होते. याशिवाय एकमेकांना व ग्रुपवर विनोदांची देवाणघेवाण करीत काहीजण हसत होते.
याशिवाय काहीजणांकडून ‘विनाकारण पोलिसांना किंवा अग्निशमन दलाला फोन करून कुठेतरी दंगा झालाय, कुठे आग लागली आहे, असे सांगून एप्रिल फूल करू नका,’ असे चांगले संदेशही पाठविले जात होते.