पारंपरिक खेळांचे जतन करणाऱ्या आधुनिक गौराई..
By Admin | Updated: September 4, 2014 00:01 IST2014-09-04T00:00:58+5:302014-09-04T00:01:43+5:30
सादरीकरणातून खेळांचे संक्रमण : समाज प्रबोधनाचा वसा

पारंपरिक खेळांचे जतन करणाऱ्या आधुनिक गौराई..
इंदुमती गणेश - कोल्हापूर -गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून स्त्रीमनाच्या भावभावनांचे कांगोरे झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक खेळातून व्यक्त होतात. एकेकाळी प्रत्येक माहेरवाशिणीचे हितगूज करण्याचे हे खेळाचे माध्यम आता कालौघात लोप पावत आहे. अशा परिस्थितीत या खेळांच्या जतन आणि संवर्धनासाठी आजच्या काळातील गौराई पुढे सरसावल्या आहेत.
पूर्वी श्रावण, मंगळागौर, गौरी-गणपती सण म्हणजे माहेरवाशिणींच्या आनंदाला उधाण असायचे. समाजसुधारणेचे फलित म्हणून आता तशी परिस्थिती राहिली नाही. संसार, नोकरीमुळे अनेक महिलांना मराठी संस्कृतीतील सण माहीत नसतात. खेळ खेळणे तर लांबची गोष्ट. झिम्मा-फुगडीच्या या पारंपरिक खेळांचा वारसा नव्या पिढीकडे सोपविण्यासाठी महिला पुढे आल्या व त्यांनी हे खेळ महिलांपर्यंत पोहोचविण्याचा वसा कित्येक वर्षे लीलया पेलला आहे.
सुशिक्षित... नोकरदार
या ग्रुपमध्ये सोळा वर्षांच्या मुलींपासून ते सत्तर वर्षांच्या आजींचा समावेश आहे. सगळ्या सुशिक्षित कुटुंबातल्या. काही गृहिणी, तर काही नोकरदार. दिवसभर आपआपले व्याप आटोपून रात्री या खेळांचा सराव केला जातो.
डोहाळे.. लग्नविधीसुद्धा...
झिम्मा, फुगडी, उखाणे या पारंपरिक खेळांसोबतच डोहाळे आणि लग्नविधी या दोन संस्कारांवरही मनोरंजनात्मक सादरीकरण केले जाते. लग्नविधी या सादरीकरणात लग्नात केले जाणारे सर्व विधी, त्यामागील अर्थ सांगितला जातो. वर-वधूसह कुटुंबीयांसाठी हा एकप्रकारे संसाराचा धडाच असतो. डोहाळे या सादरीकरणात गर्भसंस्काराचे महत्त्व, मातेचे आचरण, कुटुंबीयांची जबाबदारी विषद केली जाते.