‘आदर्श ग्राम’चे मॉडेल कोल्हापुरात!
By Admin | Updated: March 14, 2015 00:19 IST2015-03-14T00:13:16+5:302015-03-14T00:19:46+5:30
शिवाजी विद्यापीठाचा पुढाकार : राजगोळी खुर्द, पेरीडबाबत ‘यशवंतराव चव्हाण स्कूल’ची कार्यवाही सुरू

‘आदर्श ग्राम’चे मॉडेल कोल्हापुरात!
संतोष मिठारी - कोल्हापूर सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राजगोळी खुर्द, पेरीड ही गावे समाविष्ट आहेत. या गावांतील पायाभूत सुविधा, पीकपद्धती, आर्थिक नियोजन, आदी स्वरूपांतील सर्वंकष विकासाचा आराखडा, मॉडेल शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट बनविणार आहे. त्याबाबतची जबाबदारी खासदार राजू शेट्टी व धनंजय महाडिक यांनी विद्यापीठावर सोपविली आहे. त्यादृष्टीने या स्कूलची कार्यवाही सुरू झाली असून, पंतप्रधानांच्या कल्पनेतील ‘आदर्श ग्राम’चे मॉडेल यातून तयार होणार आहे.
केंद्र सरकारच्या विभागांकडून संबंधित गावांमध्ये विविध योजना राबविण्यात येतील. पण, तेथील ग्रामस्थांना नेमके काय? हवे आहे, त्यांना कसा विकास अपेक्षित आहे, हे समजून घेऊन विकासाचे मॉडेल बनविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ग्रामीण विकासाच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटला खासदार महाडिक यांनी ३ डिसेंबर २०१४ रोजी, तर खासदार शेट्टी यांनी २९ डिसेंबर २०१४ रोजी विद्यापीठाला पत्र पाठविले. त्यात त्यांनी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या आपापल्या गावांच्या विकासाचा आराखडा, मॉडेल तयार करून देण्याची मागणी केली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने ही जबाबदारी संबंधित स्कूलवर सोपविली.
त्यानुसार स्कूलच्या एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या ४० विद्यार्थ्यांनी राजगोळी खुर्दमध्ये आठ दिवसांचे शिबिर घेतले. त्यात त्यांनी या गावाचा सर्व्हे करून, लोकांशी चर्चा करून त्यांना अपेक्षित असलेल्या गावविकासाच्या दृष्टीने प्राथमिक आराखडा तयार केला आहे. पेरीडमधील सर्व्हे एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी येत्या आठवड्यात करतील.
दोन्ही गावांतील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा, गरजा, आदींबाबतची माहिती संकलित झाल्यानंतर त्यावर विद्यापीठातील अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, एमएसडब्ल्यू, सामाजिकशास्त्र, कॉमर्स, पेस्ट मॅनेजमेंट या विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून अंतिम आराखडा तयार केला जाईल. हे मॉडेल या गावांच्या भक्कम विकासाला हातभार लावणारे ठरणार आहे.
मॉडेलमध्ये हे असणार...
विकासाच्या मॉडेलमध्ये या गावांची सध्याची स्थिती, पायाभूत सुविधांची कोणत्या ठिकाणी आवश्यकता आहे, ते कसे पूर्ण करावयाचे याच्या सूचना, अर्थशास्त्रीय नियोजन, कोणत्या योजना राबविल्या पाहिजेत, या माहितीचा समावेश असणार आहे.
‘आदर्श ग्राम’बाबतचे मॉडेल बनवून घेण्याचा खासदार राजू शेट्टी व धनंजय महाडिक यांचा प्रयत्न सकारात्मक आहे. त्यांच्या मागणीनुसार राजगोळी खुर्द, पेरीडच्या विकासाचे मॉडेल बनविण्याची कार्यवाही सुरू आहे. हे मॉडेल सामाजिक-अर्थशास्त्रीय स्वरूपाचे असेल. खासदारांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या गावांच्या विकासाचे मॉडेल सादर केले जाईल.
- डॉ. व्ही. बी. जुगळे, संचालक, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट
विद्यापीठात विविध विभाग हे विकासाच्यादृष्टीने कार्यरत असून, त्यांचे संशोधन सुरू असते. आदर्श ग्राम योजनेतील गावांच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील त्यात योगदान देता येईल, या उद्देशाने विद्यापीठाचे सहकार्य घेतले आहे.
- धनंजय महाडिक, खासदार