प्रचारात आरोपांची चिखलफेक
By Admin | Updated: October 8, 2014 21:47 IST2014-10-08T21:46:04+5:302014-10-08T21:47:03+5:30
घराघरांपर्यंत प्रचार : मुश्रीफ-घाटगे यांच्यातच हातघाईची लढाई

प्रचारात आरोपांची चिखलफेक
जहॉँगीर शेख - कागल - विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी विविध माध्यमांद्वारे प्रचार यंत्रणा राबविण्यात आघाडी घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी प्रचाराचा भपका न करता थेट भेटी-गाठीवर जोर ठेवला आहे. इतर सात उमेदवारांत भाजपचे परशुराम तावरे प्रचारात सक्रिय दिसत आहेत.
आठवड्यावर मतदान येऊन ठेपले आहे. कागल तालुक्यात गावागावांतील कार्यकर्ते या गटातून त्या गटात प्रवेश करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, गडहिंग्लज, उत्तूर भागातील प्रमुख कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळविण्याकडे मुश्रीफ-घाटगेंचे अधिक लक्ष आहे. जयवंतराव शिंपींसारखा मोहरा परत मुश्रीफांनी आपल्या बाजूने सक्रिय केला आहे, तर गडहिंग्लज शहरातील जनता दलाचे पाठबळ मिळविण्यासाठी संजय घाटगे गट प्रयत्न करीत आहे. मात्र, स्वाती कोरी या चंदगडमधून लढत असल्याने या गटाचे लक्ष तिकडे अधिक आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करीत असलेल्या मुश्रीफांना जिल्ह्याच्या राजकारणातील निर्णयांची प्रतिक्रिया बघावयास मिळाली आहे.
बाळासाहेब कुपेकर यांच्यानंतर निवेदिता माने यांचे चिरंजीव सत्त्वशील माने यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राजेखान जमादार हे तर सुरुवातीपासूनच आक्रमक झालेले आहेत. या मुद्द्यांचा आपल्या प्रचारासाठी उपयोग करून घेण्याची संधी संजय घाटगेंनी दवडलेली नाही. मात्र, मुश्रीफांनी हे विषय संयमाने हाताळीत, जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहेत. माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी संजय घाटगेंची उमेदवारी जाहीर केल्याने तो गट घाटगे गटाबरोरबर प्रचारात सक्रिय आहे. प्रा. मंडलिक, वीरेंद्र मंडलिक, अमरीष घाटगे, तसेच अरुंधती घाटगे, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे हे प्रचार दौरे काढून संजय घाटगेंसाठी मते मागत आहेत. दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफांसाठी ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, समरजितसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ आक्रमकपणे प्रचार करीत आहेत, तर साजीद मुश्रीफ, सायरा मुश्रीफ, नबीला मुश्रीफ, अमरीष मुश्रीफ हे कुटुंबीयही प्रचार दौरे करून मते मागत आहेत.
स्थानिक केबलवर माहितीपटाचे प्रसारण सुरू आहे. जाहीर सभा तसेच पदयात्रा, हळदी-कुंकू, महिला मेळावे असे कार्यक्रम सुरू आहेत. आपल्या कार्याची माहिती देणारा माहितीपट मुश्रीफांच्यावतीने गावागावांत दाखविला जात आहे. प्रचार
गाणी, घोषणांच्या गाड्या फिरत आहेत. जिल्हा परिषदनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका, मंथन सुरू आहे. गावाच्या चौकात कार्यकर्त्यांचे घोळके दिसत आहेत. माहितीपुस्तिका, ध्वज, बॅनर, पताका, टी शर्ट अशी प्रचार यंत्रणेतील मुश्रीफांची आघाडी स्पष्ट दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला संजय घाटगेंच्याही जाहीर सभा, महिला मेळावे, पदयात्रा, प्रचाराच्या गाड्या दिसत आहेत. मात्र, महत्त्वाचा फरक म्हणजे मोजके कार्यकर्ते घराघरांत जाऊन लोकांना भेटत आहेत. गर्दी आणि लक्ष वेधण्याचे प्रकार टाळत आहेत.
प्रचारातील मुद्दे
मतदारसंघाचा झालेला विकास आणि पारदर्शकता
मोफत आॅपरेशन्स, पेन्शन योजना, इतर शासकीय योजना, समाजमंदिरे, देवालयांची उभारणी, पूर्ण-अपूर्ण कामे
मूठभर व्यक्तींचाच झालेला विकास
जात-धर्म मुद्द्यांचा वापर होत असल्याचे आरोप
तालुक्याची संस्कृती, क्षमता, कार्यक्षमता, उमेदवाराची कामाची पद्धत, जनतेशी संपर्क
गटा-तटाचे राजकारण, वैयक्तिक हेवे-दावे
पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि बेरोजगारी