मोक्कातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:12+5:302021-07-14T04:29:12+5:30
कोल्हापूर : संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारागृहात मोक्का कारवाई झालेल्या आरोपींशी येथील कर्मचाऱ्यांचे लागेबांधे संबंध तपासात निष्पन्न झाल्यास त्या कर्मचाऱ्यांवरही ...

मोक्कातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही मोक्का
कोल्हापूर : संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारागृहात मोक्का कारवाई झालेल्या आरोपींशी येथील कर्मचाऱ्यांचे लागेबांधे संबंध तपासात निष्पन्न झाल्यास त्या कर्मचाऱ्यांवरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे सुतोवात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी केले. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोबाईल, गांजा फेकल्याप्रकरणी आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. त्याप्रकरणी कारागृहातील काही कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत, त्या पार्श्वभूमीवर ते कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.
महानिरीक्षक रामानंद म्हणाले, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदींना गांजा, मोबाईल पुरवणाऱ्या काहीजणांवर तसेच त्यामध्ये सहभागी असलेल्या कारागृहातील बंदींवर पोलिसांनी तपासानंतर मोक्का कारवाई केली. पण कारागृहातील वादग्रस्त बंदींना मोबाईल पुरविण्याच्या प्रकरणात काही कारागृहातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे मोक्का कारवाईतील बंदीजनांशी लागेबांधे संबंध पोलीस तपासात समोर आल्यास त्या कर्मचाऱ्यांवरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशाच पध्दतीने पुणे येथील अर्थर रोड कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे कारागृह महानिरीक्षक रामानंद यांनी सांगितले.
राज्यातील ७० टक्के बंदींचे लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले, पण कोल्हापुरातील ७० टक्के बंदींचे लसीकरण झाले नसल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी तातडीने विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून कोल्हापुरातील सर्व बंदीचे लसीकरण त्वरित पूर्ण करण्याविषयी विनंती केली.
पोलिसांकडील अतिरिक्त मनुष्यबळ कारागृहाकडे वर्ग
राज्यातील कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अपुरे संख्याबळ असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यातील पोलीस विभागाकडील अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कारागृहाकडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवला आहे.
कळंब्यात आणखी ४ बॅराक
कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या गंभीर गुन्ह्यासाठी ३३ बॅराक आहेत, ते अपुरे पडत असल्याने त्यामध्ये आणखी ४ बॅराक वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.