ऑनलाईन शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:16+5:302021-08-20T04:29:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुंभोज : कोरोनामुळे शाळा बंद होऊन पर्यायी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ठायी शिकायची ...

ऑनलाईन शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभोज : कोरोनामुळे शाळा बंद होऊन पर्यायी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ठायी शिकायची ओढ तर मुलांना मोबाईल देऊ शकत नसल्याचे पालकांच्या मनातील शल्य. या दोन्हींचा ठाव घेऊन जिल्ह्यातील होतकरू तसेच गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या पुढाकाराने क्रिएटिव्ह टिचर्स फोरमच्यावतीने कोल्हापूर येथील शिक्षक बॅंकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ॲड्राॅईड मोबाईल भेट देण्यात आले. यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी आता शिक्षणाच्या प्रवाहात येणार असल्याने संबंधित विद्यार्थी तसेच पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले; तर टिचर्स फोरमला विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडसर दूर केल्याचे अतिव समाधान.
गेल्या दीड वर्षापासून प्रतिकूल परिस्थितीच्या कारणास्तव ऑनलाईन शिक्षणाच्या वाटेवर मोबाईलसाठी असंख्य विद्यार्थी चाचपडत आहेत. परिस्थितीअभावी त्यांना मोबाईल देणे पालकांना अशक्यप्राय बनले असताना समाजातील दानशुरांच्या मदतीतून विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल देण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणून क्रिएटिव्ह टिचर्स फोरमच्यावतीने जिल्हा परिषद तसेच महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या ३४ विद्यार्थ्यांना डॉ. सुनीलकुमार लवटे, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षाप्रमुख बी. एम. हिर्डेकर, चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते मोबाईल एक महिन्याच्या मोफत इंटरनेट सुविधेसह भेट देण्यात आले.
यासाठी मनोज शहा, सुजय होसमाने, आर. जे. मिलिंद आदींचे सहकार्य लाभले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी टिचर्स फोरमचे दीपक जगदाळे, विजय एकशिंगे, आर. बी. पाटील, संजय कळके, यशवंत चौगुले, राणेश्वर थोरबोले, प्रकाश ठाणेकर आदींनी परिश्रम घेतले.