कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीसोबतच आता जनजागृती करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला आहे. या कार्यकर्त्यांनी थेट स्मशानभूमीत जाऊन या अघोरी प्रकारात वापरलेल्या लिंबूंचे सरबत बनवून प्यायले. मनसेच्या या कृतीने अनेकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे.कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावच्या स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून अघोरी प्रकार केले जात आहेत. गुरुवारी सकाळी एका मृत व्यक्तीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी संतोष कांबळे, शशिकांत खांडेकर, दगडू कांबळे, बाळकृष्ण शिंगे, किरण कमांडर या कार्यकर्त्यांना शवदाहिन्यांवर काही व्यक्तींच्या फोटोंना टाचणी मारलेली, हळदी-कुंकवाने माखलेले नारळ, लिंबू, काळे मणी, तंबाखू, चिलीम, गांजा हे सर्व काळ्या कपड्यांमध्ये बांधून अघोरी प्रकार केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांमधील ही भीती दूर करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क या अघोरी प्रकारात वापरलेल्या लिंबूचे सरबत बनवून प्यायले. मनसेच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी अशी करणी करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला आहे.
Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी प्रकारात वापरलेल्या लिंबूचे सरबत केले, मनसेच्या कृतीने झणझणीत अंजन घातले- video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:56 IST