आज ठरणार आमदार
By Admin | Updated: October 19, 2014 00:48 IST2014-10-19T00:48:12+5:302014-10-19T00:48:35+5:30
सत्तेसाठी प्रतिष्ठा : निकालाबाबत कमालीची उत्कंठा; मतमोजणी यंत्रणा कार्यरत

आज ठरणार आमदार
कोल्हापूर : जिल्ह्यातील काही उमद्या कार्यकर्त्यांसह अनेक मातब्बर नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारी मतमोजणी आता काही तासांवरच येऊन ठेपली असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील आम जनतेत निकालाविषयीची उत्कंठा ताणली गेली आहे. ‘कोण निवडून येणार?’ एवढा एकच प्रश्न आज, शनिवारी ज्याच्या-त्याच्या मुखात घोळत राहिला. दिवाळी चार दिवसांवर राहिली असली तरी विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांनी उद्याच, रविवारी ती फटाके फोडून साजरी करण्याचे नियोजन केले. दरम्यान, मतमोजणीची शासकीय यंत्रणा कार्यरत झाली असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ‘खुल जा सीम सीम’ म्हणत मतांची मोजणी सुरू होईल.
राज्यात सर्वच पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार, याचा
अंदाज बांधणे मतदारांना अशक्य झाले आहे. त्यामुळेच निकालाविषयी कमालीची उत्कंठा ताणली गेली आहे.
जिल्ह्यातील लक्षवेधी लढती
संपूर्ण राज्याचे लक्ष कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना शिवसेनेच्या संजय घाटगे यांनी तगडे आव्हान दिले असून, घाटगे यांना सदाशिवराव मंडलिक यांनी पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी राजकारणातील नवख्या असलेल्या अमल महाडिक यांनी मोठी लढत दिली असून, त्यांच्यामागे खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांनी मोठी ताकद उभी केली आहे. अमल यांच्यासाठी स्वत: नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली.
‘करवीर’मध्ये निवडून येण्याची संधी असलेल्या शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांना कॉँग्रेसच्या पी. एन. पाटील यांनी चांगलीच लढत दिली आहे. पी. एन. पाटील यांना प्रचारादरम्यान मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
‘शिरोळ’मध्ये आप्पासाहेब पाटील (कॉँग्रेस) यांच्यासमोर राजेंद्र पाटील यड्रावकर (राष्ट्रवादी), उल्हास पाटील (शिवसेना) यांनी कडवी झुंज दिली आहे. येथे जातीय राजकारणानेही उचल खाल्ली असल्याने मतदार कोणाला मत देतात, हा उत्सुकतेचा विषय आहे.
‘राधानगरी’तून प्रकाश आबिटकर (शिवसेना) यासारख्या तरुण व उमद्या कार्यकर्त्याने आमदार के. पी. पाटील (राष्ट्रवादी) यांच्या छातीत धडकी
भरविली आहे.
दहा वाजेपर्यंत कल कळणार
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पोस्टाने आलेल्या मतपत्रिका प्रथम मोजण्यात येणार आहेत. आलेल्या मतपत्रिका सॉर्टिंग करणे आणि मोजणे याकरिता तास दीड तासाचा अवधी लागणार आहे. त्यानंतर मतदान यंत्रे बाहेर काढून त्यांवरील मतदान मोजण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मतमोजणीचा कल हा साधारण १० वाजेपर्यंत कळेल, अशी अपेक्षा आहे. निकालाचे चित्र साधारणपणे १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल. मतदान यंत्रांवरील मोजणी ही प्रत्यक्षात दोन तासांत होईल; परंतु बेरजा करणे, निकाल तयार करून जाहीर करणे ही प्रक्रिया दुपारी दोनपर्यंत सुरू राहील.
१९ आजी-माजी आमदार
या लढतीत दहा विद्यमान आमदारांसह पी. एन. पाटील, भरमू पाटील, नरसिंगराव पाटील, संजय घाटगे, राजू आवळे, सत्यजित पाटील, सुरेश साळोखे, प्रकाश आवाडे आणि जयवंतराव आवळे हे रिंगणात आहेत.
सहा माजी मंत्री पुन्हा मैदानात
या निवडणुकीत हसन मुश्रीफ, सतेज पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, विनय कोरे, भरमू पाटील हे माजी मंत्री व राज्यमंत्री पुन्हा मैदानात आहेत.
ज्येष्ठ व तरुण उमेदवार
शिरोळमधून काँग्रेसकडून ९४ वर्षांचे राज्यातीलच नव्हे, तर ‘देशातील सर्वांत ज्येष्ठ उमेदवार’ म्हणून आमदार सा. रे. पाटील रिंगणात आहेत. ‘कोल्हापूर दक्षिण’मधून भाजपकडून ‘सर्वांत तरुण उमेदवार’ म्हणून अमल महाडिक (वय ३५) रिंगणात आहेत.
मतमोजणी स्थळ
कोल्हापूर/करवीर : शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजी विद्यापीठजवळ. कागल : जवाहर नवोदय विद्यालय. शाहूवाडी-पन्हाळा : शाहूवाडी तहसील कार्यालय. राधानगरी-भुदरगड : गारगोटी येथील मौनी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुल इमारत. शिरोळ : पंचायत समितीच्या सभागृह. इचलकरंजी : राजीव गांधी सांस्कृतिक भवन. हातकणंगले : शासकील धान्य गोदाम. चंदगड : गडहिंग्लज नगरपालिका पॅव्हेलियन हॉल.
‘मोदी इफेक्ट’ची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिभेचा तसेच वाणीचा शहरी मतदारांवर परिणाम झालेला आहे; परंतु तो मतदान यंत्रांच्या बटनावर किती ताकदीने उमटला आहे, याचा नेमका अंदाज भल्याभल्यांनाही बांधता आलेला नाही; परंतु राजकीय बदल हवाच म्हणणाऱ्यांची संख्या आणि त्याची होणारी चर्चा पाहता ‘मोदी इफेक्ट’ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही; परंतु कोणाचा तरी पराभव करण्यासाठी हा इफेक्ट कारणीभूत ठरणार की भाजपच्या उमेदवारांना मदत करणार, हे उद्याच कळणार आहे. मोदी यांच्या प्रचाराच्या या सभेतून भाजप मतदारसंघात किती परिवर्तन होते याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
चार महिला
चंदगडमधून आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याविरोधात माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची कन्या स्वाती कोरी या जनता दलातर्फे रिंगणात आहेत. त्याशिवाय ‘देशातील पहिला महिला कारखाना’ अशी ओळख असलेल्या भुदरगड तालुक्यातील इंदिरा महिला सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई या राधानगरी मतदारसंघातून अपक्ष व हातकणंगले मतदारसंघातून सुमन कांबळे या अपक्ष लढत आहेत.