आमदार पी. एन. पाटील लेख....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:34+5:302021-01-08T05:14:34+5:30

पक्षाबरोबरच आपल्या नेतृत्वावर निष्ठा कशी असावी, हे फक्त काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मैत्रीसाठी ...

MLA P. N. Patil article .... | आमदार पी. एन. पाटील लेख....

आमदार पी. एन. पाटील लेख....

पक्षाबरोबरच आपल्या नेतृत्वावर निष्ठा कशी असावी, हे फक्त काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मैत्रीसाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारीही त्यांची असते. नेतृत्वावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार पाटील हे नेहमीच घेत आले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची मैत्री घट्ट होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, आमदार पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याची खात्री आमच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य माणसाला होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही, म्हणून ते कधी नेतृत्वावर नाराज झाले नाहीत. विलासराव देशमुख यांच्या मैत्रीत कधी कटुता येऊ दिली नाही. उलट पूर्वीपेक्षाही अधिक निष्ठेने व ताकदीने पक्षवाढीचे काम केले. अनेक वर्षे ते ‘सांगरूळ’ व ‘करवीर’ मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये वाढतच गेली आहे. त्यांनी आपल्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये जिवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले. कार्यकर्त्यांवर ते जिवापाड प्रेम करतात. सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची पदे मिळाली पाहिजेत, यासाठी त्यांचा आग्रह कायम असतो. त्यामुळेच त्यांच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. कोणतीही निवडणूक असो, त्यांची तयारी असते. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक दबदबा निर्माण केला आहे.

मैत्रीच्या पातळीवर आमदार पी. एन. पाटील यांच्यासारखे दुसरे कोणी दिसत नाही. प्रामाणिकपणे मैत्री जपणारे आणि दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख जिल्ह्यात आहे. माझ्या ज्येष्ठ मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो.

- हसन मुश्रीफ (ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य)

शेतकऱ्यांचे हित जोपासणारे नेतृत्व, ‘पी. एन. पाटील’

शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारी अनेक मंडळी आपण पाहतो, मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे नेतृत्व कोण असेल, तर ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे १९९० ला ते अध्यक्ष झाले, त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी ७ टक्के व्याजाने पीक कर्ज दिले. एवढ्या कमी व्याजाने पीक कर्ज देणारी कोल्हापूर जिल्हा बॅँक ही देशातील पहिली बॅँक होती. आमदार पाटील यांच्या या निर्णयाचे सहकार क्षेत्रातून कौतुक झालेच, मात्र देशाचे अर्थतज्ज्ञ आणि तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी पत्र पाठवून त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यावेळीच त्यांच्या सहकार क्षेत्रातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर जिल्हा बॅँकेच्या राजकारणात ते राहिले. वेळोवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. नुकतीच जिल्हा बॅँकेच्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची सूचना केली आणि त्यानुसार निर्णयही घेण्यात आला. अशा, शेतकऱ्यांची कणव असणाऱ्या नेतृत्वाचा आज, बुधवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्त.....

पी. एन. पाटील यांची प्रतिमा आणि ओळख ही प्रखर काँग्रेसवादी कार्यकर्ता, नेता अशी आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी अनुभवले. स्वत:च्या फायद्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्याला कसे बळ मिळेल, त्याचा मान-सन्मान कसा वाढेल, त्याचबरोबर सामान्य माणसांच्या जीवनात काही तरी चांगले घडावे आणि ते आपण घडवावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. आतापर्यंत त्यांनी सहा विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. त्यातील दोन वेळाच त्यांना विजय मिळाला; पण कार्यकर्त्यांचे मोहोळ कायम राहिले. २०१९ च्या निवडणुकीत आमदार म्हणून जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. १९८० पासून ४० वर्षांहून अधिक काळ विरोधकांना थोपवून धरत, प्रसंगी त्यांच्यावर मात करून पक्ष बळकट केला. पक्षावर त्यांनी निष्ठा ठेवून काम केले. पक्षासंदर्भात अशी निष्ठा बाळगून त्यांना काय मिळाले? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पी. एन. पाटील यांचे कार्यकर्ते तर सात्त्विक संतापाने त्यांच्या अविरत निष्ठेचे दाखले देत असतात. मात्र राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. त्यांनी अनेक वेळा संयम बाळगल्याने निष्ठावंतांच्या यादीत त्यांचे स्थान अग्रभागी आहे.

समाजकारण आणि राजकारणातील चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी तालुका संघ, सूतगिरणी, बॅँक अशा संस्था उभारून शेतकरी आणि तरुणांसाठी आर्थिक पाठबळ मिळवून दिले. संस्था कशा असाव्यात, याचे आदर्श उदाहरण म्हणून या संस्थांचा उल्लेख होतो. सहकाराच्या क्षेत्रात इतरत्र घोटाळे, भ्रष्टाचार होत असताना, कोणताही डाग नसणारी सहकार चळवळ त्यांनी उभी केली आहे. राजकारणाच्या बदलणाऱ्या रंगाने सत्तेला केंद्रस्थानी आणले असतानाच्या काळात पी. एन. पाटील मात्र अविरतपणे राजीव गांधी यांची जयंती सलग २५ वर्षे साजरी करतात. ही गोष्टच त्यांच्या पक्षनिष्ठेची पावती देणारी आहे. सत्तेचे पाठबळ असो अगर नसो; आपल्या विचार व कृतीवर ठामपणे उभे राहणाऱ्या या नेत्याने राजकारणातील साधनशुचितेला प्राधान्य दिले. कधीही विचारांशी तडजोड केली नाही किंवा कुणाशी अभद्र युतीही केली नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैशिष्ट्य त्यांना इतर राजकारण्यांपासून वेगळे बनविते. बदलत्या काळात त्यांचे राजकारण त्यांची शैली यासंदर्भात टीकाटिपणी होत राहील. लोकशाहीत अशी प्रक्रिया सातत्याने होत असते. पण एक बाब लक्षात घ्यावयास हवी की, पी. एन. पाटील यांनी मनाला न पटणारी गोेष्ट केली नाही. तिचे राजकीय फायदे-तोटे काहीही झाले तरी, राजकारणातील जपलेली मूल्ये अबाधित ठेवण्याची पराकाष्ठा करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला. आपल्या विचारांशी अशी बांधिलकी जपणारा राजकारणी आजच्या राजकारणात अभावानेच आढळतो.

पी. एन. पाटील यांच्या राजकारणाला अनेक पदर आहेत. गावा-गावात उभारलेल्या संस्था, अनेक ठिकाणी काम करणारे तरुण, जिवाला जीव देणारे कार्यकर्ते यांच्या बळावर पी. एन. पाटील आजही ठामपणे उभे आहेत. आमदार असो नसो; मंत्रिपदावर संधी मिळो न मिळो; सत्ता असो नसो; पण आजही सरकारदरबारी आमदार पाटील यांचे काम एखाद्या मंत्र्याला मागे टाकेल असेच राहिले आहे. त्यांच्या शब्दाचे वजन काय असते, याची प्रचिती त्यांच्या कार्यकर्त्यांना येते. उभे आयुष्य सामान्य माणसाला उभे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या कणखर नेतृत्वाला परमेश्वर निरोगी, दीर्घायुष्य देवो! वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा..!

-------------------------

कार्यकर्त्यांचे टॉनिक म्हणजे ‘पी. एन.’साहेब

नेता कसा असावा आणि त्याचे कार्यकर्ते कसे असावेत, हे आमदार पी. एन. पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांकडे पाहिल्यानंतरच समजते. तरुणांबरोबरच वयोवृध्द कार्यकर्तेही आमदार पाटील यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. साहेबांची भेट हीच कार्यकर्त्यांसाठी टॉनिक असते.

-------------------------------------

- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)

----------------------------------------

पी. एन. पाटील लेख

विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व

राजकारण आणि समाजकारणात दिलेला शब्द पाळणारी माणसं फार दुर्मिळ असतात. मात्र शब्दाशी पक्के आणि कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर, पण शब्दाशी जागणारे, विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व म्हणजे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील साहेब.

श्रीपतराव बोंद्रेदादा यांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारणात उतरलेले आमदार पाटील यांनी कधीही सत्तेसाठी तडजोड केली नाही. सत्तेच्या मागे फरफटत ते कधी गेले नाहीत, उलट त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेक वेळा सत्तेची पदे त्यांच्यासोबत आली. गांधी कुटुंबावर त्यांची अपार निष्ठा आहे. पक्षाबरोबरच आपल्या नेतृत्वावर कशी निष्ठा असावी, हे फक्त त्यांच्याकडूनच शिकावे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचे स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र पाहतोय. एखाद्याशी मैत्री केली तर त्याच्याशी गद्दारी कधी करायची नाही. त्यासाठी मग कितीही शक्तिवानाला अंगावर घेण्याची तयारी त्यांची असते. मैत्री आणि दिलेल्या शब्दाला कसे जागावे, ही शिकवण त्यांच्याकडूनच मिळते. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्याबद्दल आदर पाहावयास मिळतो.

सहकारात त्यांनी नि:स्वार्थीपणे काम केले. त्यामुळेच जिल्हा बँक, श्रीपतरावदादा बँक, राजीवजी सूतगिरणी, भोगावती साखर कारखाना अशा विविध संस्थांवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आमदार पाटील यांचे गेली तीन दशके राजकारण सुरू आहे. जिल्हा बँकेतही काम करताना सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, यासाठी ते नेहमी आग्रही असतात. अशा विकासाभिमुख नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. त्यांचे नेतृत्व यापेक्षाही वाढत जावे, या सदिच्छा..!

- ए. वाय. पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

शब्दाला वजन आणि धारही

गेल्या तीस वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा चढ-उतार आले. मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मोहळ कधी कमी झाले नाही. सत्ता असो अथवा नसो, सर्वच ठिकाणी त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन आणि धारही राहिली आहे.

-------------------------------------

तीस वर्षे राजकारणात दबदबा ठेवणारे नेते

गेल्या तीस वर्षांत आमदार पी. एन. पाटील साहेबांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, अनेक बरे-वाईट प्रसंग आले, मात्र ते यशाने कधी हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने खचले नाहीत. त्यामुळे कायम लाखापेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा संच त्यांच्यासोबत राहिला.

सहकारात काम करताना त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. संस्थेचे हित सांभाळत असताना सभासदांचा फायदा कसा होईल, याचा सातत्याने ते विचार करतात. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वच संस्था राज्यात आदर्शवत चालल्या आहेत. साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या ‘गोकुळ’ने तर सामान्य दूध उत्पादकांच्या जीवनात क्रांती केली. कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असताना, ग्रामीण भागाचे अर्थकारण केवळ ‘गोकुळ’मुळे सुरू राहिले, हे कोणालाही नाकारता येणार नाही. ज्या संस्थेत ते काम करतात, तिथे आपल्या कामाची छाप पाडतात.

साहेबांच्यावर कार्यकर्ते जिवापाड प्रेम करतात. अनेक नेत्यांवर त्यांचे कार्यकर्ते प्रेम करत असतीलही, मात्र साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाचे मोजमाप करता येणार नाही. केवळ कार्यकर्तेच त्यांच्यावर प्रेम करतात असे नाही, तर कार्यकर्ता आपल्या कुटुंबातीलच आहे, अशा भावनेने ते कार्यकर्त्यांवर प्रेम करतात. त्यामुळेच साहेब व कार्यकर्ते यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले आहे.

राजकीय जीवनात वावरत असताना साहेबांनी कधी विरोधकांचा द्वेष केला नाही. निवडणुकीच्या रणांगणात ताकदीने लढाई करतील, मात्र त्यानंतर मतदारसंघात केवळ विकास हेच ध्येय ठेवून काम केले. त्यामुळेच विरोधकांमध्येही त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर इतकी वर्षे कोणाची पकड राहिली नाही. आपल्या कामातून आणि काँग्रेस पक्षावरील निष्ठेतून त्यांनी पक्षात आदराचे स्थान तर निर्माण केलेच, त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणातही साहेबांच्या शब्दाला वजन निर्माण झाले. अशा कर्तृत्ववान व निष्ठावंत नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो....!

- उदयसिंह पाटील-काैलवकर

(व्हा. चेअरमन, भोगावती साखर कारखाना)

कर्जमाफीची मागणी करणारे पहिले आमदार

तीस वर्षांच्या कारकीर्दीत साहेबांनी शेतकरी हिताचा विचार केला. मग जिल्हा बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजाने कर्जपुरवठा असेल किंवा तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा असेल. त्याशिवाय विधिमंडळात सरसकट कर्जमाफीची मागणी करणारे पी. एन. पाटील हे पहिले आमदार आहेत.

------------------------------------------------

गेल्या तीन पिढ्या आमदार पी. एन. पाटील यांच्याशी आडनाईक कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. माझे चुलते बी. एच. आडनाईक यांच्या माध्यमातून आमचा साहेबांशी संबंध आला. साहेबांच्या सहवासात गेल्यानंतर आजअखेर आम्ही दुसरा विचार कधी केला नाही. आज गणेश आडनाईक यांच्या माध्यमातून तिसरी पिढी साहेबांच्या सोबत आहोत. साहेबांचे आडनाईक कुटुंबावर जिवापाड प्रेम आहे. त्यांची वटवृक्षासारखी सावली आमच्यासोबत असल्याने आयुष्यात कोणतेही संकट आले तरी न डगमगता आम्ही पुढे जातो.

अलीकडे स्वार्थापोटी माणसं देव आणि निष्ठा बदलतात, मात्र काँग्रेस पक्ष आणि आपल्या नेतृत्वावरील श्रध्दा कधी साहेबांनी कमी होऊ दिली नाही. एकदा आमचे चुलते बी. एच. आडनाईक यांना सहज विचारले, ‘बापू, आपण साहेबांवर इतके प्रेम का करता?’ त्यावेळी बापूंनी दिलेले उत्तर खूप महत्त्वाचे आहे. अलीकडच्या स्वार्थी व मतलबी जगात एखाद्याच्या पायावर विश्वासाने डोके टेकावे, असे कोणते व्यक्तिमत्त्व असेल, तर ते एकमेव पी. एन. पाटील आहेत. साहेबांची काम करण्याची पध्दत, कितीही मोठे संकट आले तर ते परतवून लावण्याची धमक आणि कामाबाबत स्पष्टवक्तेपणा इतर कोणत्याही नेत्यांकडे नाही. त्यामुळे बापूंची शिकवण होती, काही झाले तरी साहेब सोडून आपणाला कोणताही विचार करायचा नाही. गेल्या तीन पिढ्या आणि आमचे नातेवाईक साहेबांच्या सावलीखाली आहेत. कार्यकर्त्याला बळ देणारे, शेतकऱ्यांचे कैवारी आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

- शिवाजीराव आडनाईक

(सहायक व्यवस्थापक, जिल्हा बॅँक)

(शब्दांकन : सुनील चौगले, आमजाई व्हरवडे).

Web Title: MLA P. N. Patil article ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.