महापालिका वाहनाचा गैरवापर, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:41+5:302021-06-18T04:16:41+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या वाहनाचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाईची टाळाटाळ करणाऱ्या सहायक आयुक्त चेतन कोंडे यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल करावी तसेच ...

महापालिका वाहनाचा गैरवापर, कारवाईची मागणी
कोल्हापूर : महापालिकेच्या वाहनाचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाईची टाळाटाळ करणाऱ्या सहायक आयुक्त चेतन कोंडे यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल करावी तसेच तत्कालिन कर निर्धारक संजय भोसले यांच्यावर फौजदारी करावी, अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी एका पत्रकाद्वारे केली.
महापालिकेच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक व करनिर्धारक व संग्राहक पदाचा कार्यभार नसताना संजय भोसले यांनी पालिकेच्या वाहनाचा गैरवापर केला होता. याबाबत आपण लेखी तक्रार तसेच वाहनाच्या गैरवापराचे पुरावे तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे सादर केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी चौकशी करून वाहनावर झालेला इंधन खर्च, चालक पगार, मेंटेनन्स खर्च त्वरित वसूल करण्याचे आदेश सहायक आयुक्त चेतन कोंडे यांना दिले होते.
परंतु सात महिने झाले तरी कोंडे यांनी कारणे दाखवा नोटीस वगळता कोणतीच कारवाई केली नाही. म्हणून कोंडे यांच्याकडूनच नुकसानीची रक्कम वसूल करावी, असे शेटे यांनी म्हटले आहे. भोसले हे कर्मचारी संघाचे अध्यक्ष असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने कारवाईत दिरंगाई होत असल्याचे शेटे यांचे म्हणणे आहे.