संदीप आडनाईककोल्हापूर : सात हजार मैलावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वयाच्या तिशीत आलेले अमेरिकन मिशनरी रे. डॉ. हेन्री जॉर्ज हॉवर्ड यांनी १९ व्या शतकात जिल्ह्यातील कोडोली, पन्हाळा, बोरपाडळे भागात धर्मप्रसारासोबत शैक्षणिक क्रांतीचे प्रवर्तक म्हणून काम केले. त्यांच्या स्मृती या गावांनी जपल्या आहेत.अमेरिकन प्रसबिटेरियनच्या निधीतून कोडोलीत १९१९ मध्ये चर्च बांधले. शाळेसाठी बोर्डिंगच्या इमारती बांधल्या. १८७० मध्ये कोडोलीत रेव्ह. टेरफोर्ड आणि ॲडिलेड ब्राउनबाई यांनी सुरू केलेली शाळा नंतरच्या काळात मोठे शैक्षणिक संकुल बनले. त्याचे खरे प्रवर्तक डॉ. हेन्री जॉर्ज हॉवर्ड होते. टेक्सासच्या विश्व विद्यापीठ तसेच प्रिन्स्टन ईश्वरविज्ञान पाठशाळेचे पदवीधर, बर्लिन आणि लायपझिंग विश्वविद्यापीठातून हिब्रू भाषेचे अध्ययन करणारे डॉ. हॉवर्ड यांनी अमेरिका आणि सिरियात ख्रिस्ती सेवाकार्य केल्यानंतर १९०७ मध्ये मिरजेत आले. सर डॉ. विल्यम वॉनलेस यांनी त्यांचे स्वागत केले. १९०८ मध्ये चर्च कौन्सिलने त्यांना कोडोली मिशन ठाण्यावर पाठवले. त्यांनी बोरपाडळे, माजगाव, तिरपण, केर्ले, येलूर, इस्लामपूर, ऐतवडे, कामेरी, बिळाशी, सरुड येथे प्राथमिक शाळा सुरु केल्या. या सर्व शाळा १९६० नंतर जिल्हा परिषदेने ताब्यात घेतल्या. हॉवर्ड यांच्या प्रयत्नातून बोरपाडळे गावात १३ मार्च १९५५ रोजी ख्रिस्ती मंडळाची स्थापना झाली. गावकऱ्यांनी ८ गुंठे जागा स्वखुशीने दिली. श्रमदानातून २५ बाय ४० फूट देखणे चर्च बांधले.
मोडी लिपीचे मास्टरडॉ. हॉवर्ड यांनी या भागात १९६८ पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ६० वर्षे काम केले. लोकजीवन, भाषा, संस्कृतीचा अभ्यास केला. ते बहुभाषी होते. मराठीच नव्हे तर संस्कृत, इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, हिब्रू भाषा त्यांना येत. मोडी लिपी अवगत केली. त्यांची मुलेही याच शाळेत शिकली. त्यांना धोतर आणि फेटा, मुलीला साडी परिधान करून शाळेला पाठविले इतके ते या भागाशी एकरूप झाले होते. १९०८ ते १९४० ते कोडोलीच्या समाजशिक्षण मिशनरी शाळेचे प्राचार्य राहिले. कोडोलीत हॉवर्ड बंगला, हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल आणि चर्च ही त्यांची स्मारके आजही आहेत.गुलाबराव आवडे यांची दोन पुस्तकेबोरपाडळे गावचे गुलाबराव आवडे यांनी लिहिलेल्या डॉ. हेन्री हॉवर्ड : जीवन व कार्य आणि बोरपाडळे ख्रिस्ती समाजाच्या स्थित्यंतराचा इतिहास या दोन पुस्तकातून ख्रिस्ती धर्मप्रसार आणि शिक्षणप्रसाराची माहिती मिळते.