शाहूंच्या विचारांचा प्रसार हेच मिशन

By Admin | Updated: December 30, 2016 00:05 IST2016-12-30T00:05:02+5:302016-12-30T00:05:02+5:30

जयसिंगराव पवार : शाहू चरित्र वेगवेगळ्या भाषेत

The mission is to spread the thoughts of Shahu | शाहूंच्या विचारांचा प्रसार हेच मिशन

शाहूंच्या विचारांचा प्रसार हेच मिशन

महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शाहू चरित्र जगभरात पोहोचावे यासाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ. जयसिंगराव पवार हे आज, शुक्रवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज, महाराणी जिजाबाई, महाराणी ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांना साकल्याने महाराष्ट्रासमोर मांडण्याचे श्रेय डॉ. पवार यांना जाते. त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.


प्रश्न : सांगली जिल्ह्यातील तडसर हे जन्मगाव ते कोल्हापूर ही कर्मभूमी हा प्रवास कसा झाला?
उत्तर : माझे वडील शेतकरी मात्र शिक्षणप्रेमी. त्या काळात विनामोबदला ते पौराहित्य करीत होते. शाळकरी वयात शेतात जेवत असताना समोर हिरवं पीक पाहून मी त्यांना म्हणालो की, मला दोन बैलं घेऊन द्या. मी शेती करतो. कारण पुढं शिकण्याची आमची आर्थिक स्थिती नव्हती. तेव्हा ते म्हणाले, माझा जीव गहाण टाकीन; पण तुला शिकायचं असेल तर तू शिक आणि मग मी जुन्या अकरावीनंतर कोल्हापुरात आलो.
प्रश्न : महाविद्यालयीन शिक्षणाचा अनुभव कसा होता?
उत्तर : राजाराम महाविद्यालयात मी शिकत होतो. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये मी राहायला होतो. डी. बी. पाटील, गोविंद पानसरे मला सीनिअर होते; पण माझं शिक्षण झालं ते कर्मवीर अण्णा पाटील, माझे वडील आणि शाहू महाराजांमुळे. त्यांनी जर आमच्यासारख्या मुलांसाठी वसतिगृहं काढली नसती, तर आम्हाला शिकायला मिळालं नसतं. त्यामुळं मी या सर्वांचे ॠण मानतो.
प्रश्न : नोकरीची सुरुवात कशी झाली?
उत्तर : सन १९६२ मध्ये मी इतिहास, राज्यशास्त्र विषय घेऊन बी. ए. झालो आणि सन १९६४ मध्ये एम. ए. झालो. दरम्यान, मुंबईच्या इस्माईल युसूफ कॉलेजला नोकरी करायला जाण्याची संधी मला मिळाली. अशातच गावाकडे गेलो असता महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार हे आमच्या गावचे. त्यांच्या चुलत्यांनी मला विचारले की, अरे तुझ्याकडे एम. ए. झालास किंवा परीक्षेला बसलास याचा एकही पुरावा नाही आणि तू नोकरी कशी करणार? मग मी बोनाफाईड सर्टिफिकेट घेण्यासाठी कॉलेजवर आलो. दुसऱ्या दिवशी सर्टिफिकेट मिळणार असल्याने मी सहज म्हणून शिवाजी विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना भेटायला गेलो. त्यांनी दोन तास आस्थेनं माझी माहिती घेतली आणि मला विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये संशोधन सहायक म्हणून काम सुरू करायला सांगितलं. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी मी गावाकडे एका हायस्कूलवरही चार महिने काम केलं, अशी माझी नोकरीची सुरुवात झाली.
प्रश्न : संशोधनाच्या कामाला सुरुवात कशी झाली?
उत्तर : विद्यापीठाच्या इतिहास विभागात संशोधक म्हणून काम सुरू केल्याने रोज कागदपत्रे तपासणे, त्यांच्या प्रेससाठीच्या प्रती तयार करणे, हे काम सुरू झाले. अशातच मुंबईचे संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी संशोधनाचा १५ दिवसांचा अभ्यासक्रम तयार केला होता. त्यासाठी कुलगुरूंनी मला मुंबईला पाठविले. त्याचवर्षी त्यांनी महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना केली आणि त्या अधिवेशनात मला पेपर सादर करण्यासाठी पाठविण्यात आले. मी शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी राणी जिजाबाई यांच्यावरील पेपर तिथे सादर केला आणि त्याचे मोठे कौतुक झाले. त्या सत्राचे प्रमुख असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक न. र. फाटक यांनी समारोपावेळी माझे पुन्हा जाहीर भाषणात कौतुक केले. मला यामुळे आत्मविश्वास मिळाला. दरम्यान, प्राचार्य एम. आर. देसाई यांनी माझी निवड केली आणि गोखले कॉलेजला मी रुजू झालो व तिथे पाच वर्षे सेवा केली.
प्रश्न : महाराणी ताराराणींच्या चरित्राचा विषय कसा सुचला?
उत्तर : माझ्या आयुष्यात अनेक घटना या योगायोगाने घडल्या आहेत. व्ही. टी. पाटील यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या संस्थेच्या प्रांगणात ठेवली होती. पत्नी सौ. वसुधा यांच्या आग्रहामुळे मी तिथे गेलो, तर पुरंदरेंनी तुमच्याच कोल्हापुरात एक तरुण इतिहास संशोधक चांगले काम करतोय, अशी माझी ओळख करून दिली. तेव्हा मी प्रेक्षकात होता. तिसऱ्या दिवशी व्ही. टी. पाटील यांनी मला व्यासपीठावर बोलावून घेतले आणि ताराराणी यांच्यावर पुस्तक लिहिण्याची सूचना केली. व पुरंदरे यांच्याच हस्ते सन १९७५ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
प्रश्न : शाहू चरित्र ग्रंथाकडे कसे वळलात?
उत्तर : सन १९८४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाने शाहू महाराजांवर तीन व्याख्याने देण्यासाठी मला निमंत्रित केले. त्यामुळे मी शाहू महाराजांविषयी वाचन सुरू केले. तेव्हा त्यांनी करून ठेवलेल्या क्रांतिकारी कामांनी मी भारावून गेलो. वाचन सुरू ठेवले. दरम्यान, सन १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना केली. तत्कालिन खासदार रजनी पाटील यांच्या माध्यमातून खासदार कांशीराम यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींकडून पाच लाख रुपये शाहू ग्रंथासाठी दिले आणि तेथून मग आम्ही मागे पाहिले नाही. सन २००१ मध्ये न्यू पॅलेसच्या हिरवळीवर शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले आणि आजपर्यंत शाहू चरित्र ग्रंथाच्या १५ हजार प्रती संपल्या. देशी-विदेशी भाषांमध्ये शाहू चरित्र गेले. गुजराती, सिंधी आता तयार आहे.
प्रश्न : पुढचा संकल्प काय आहे?
उत्तर : शाहू चरित्राची तिसरी आवृत्ती, ताराराणी यांच्या सुधारित चरित्राचे प्रकाशन केले जाणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांवर पारंपरिक नव्हे, तर विश्लेषणात्मक पद्धतीने ग्रंथ लिखाण करणार आहे, तसा ‘शब्द’ मी गोविंद पानसरे यांना दिला होता. आत्मचरित्रही लिहायचे आहे. त्याही कामाला आता सुरुवात करणार आहे.
प्रश्न : कोल्हापूरबाबत तुमच्या भावना काय आहेत?
उत्तर : माझा जन्म जरी सांगली जिल्ह्यात झाला असला तरी कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. आज मी जो काही आहे ती ओळख कोल्हापूरमुळे आणि शाहू महाराजांमुळे मिळाली आहे. मी एक शाहू विचारांचे प्रॉडक्ट आहे, असे मानतो. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी शाहू विचारांचा जगभर प्रसार हेच मिशन म्हणून काम करीत राहणार आहे.
- समीर देशपांडे

Web Title: The mission is to spread the thoughts of Shahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.