शिंगणापूरच्या कोविड सेंटरवरील सारेच बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST2021-09-17T04:28:20+5:302021-09-17T04:28:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या जसजशी कमी येऊ लागली आहे, तसे आता कोविड सेंटर्सकडेही आरोग्य ...

शिंगणापूरच्या कोविड सेंटरवरील सारेच बेपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या जसजशी कमी येऊ लागली आहे, तसे आता कोविड सेंटर्सकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे की काय, अशी परिस्थिती शिंगणापूर येथील विद्यानिकेतनमध्ये बुधवारी रात्री पाहावयास मिळाली. रात्री साडेनऊ ते साडेदहा या एका तासात या सेंटरवर ना डॉक्टर उपस्थित होते, ना सिस्टर. एकही कर्मचारी उपस्थित नसलेले हे सेंटर जिल्हा परिषद कोणासाठी चालवत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेने चांगली कामगिरी केली आहे. मोठी रुग्णसंख्या असलेल्या करवीर तालुक्यातील रुग्णांसाठी शिंगणापूर येथील विद्यानिकेतनमध्ये कोविड सेंटरही उभारण्यात आले. याचा लाभही शेकडो रुग्णांना झाला. पण आता हे कोविड सेंटर बेवारस बनल्याचे एका सजग वाचकाने ‘लोकमत’ला कळविले. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बुधवारी रात्री प्रत्यक्ष सेंटरला भेट दिली असता, धक्कादायक स्थिती पाहावयास मिळाली. या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. दारे सताड उघडी होती. ऑक्सिजनचे सिलिंडरही उघड्यावर होते. औषधे, गोळ्या, अन्य वैद्यकीय साहित्य उघड्यावर पडून होते. रजिस्टरही तशीच उघड्यावर ठेवण्यात आली होती. दहा हाका मारल्या तरी, कोणीही या ठिकाणी ओ देण्यासाठी हजर नव्हते.
या सेेंटरवर दोन महिला कर्मचाऱ्यांनाच रोज रात्री डयुटी दिली जाते, असे यावेळी समजले. जर हे सेंटर गावाबाहेर असेल, आणि आता तेथे कोणी रुग्ण नसतील, तर त्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
चौकट
साहित्य चोरीला गेल्यावरच जाग येणार का?
जर तासभर थांबल्यानंतरही या सेंटरवर कोणी येणार नसेल, तर याच काळात कोणी या ठिकाणच्या साहित्याची चोरी केली किंवा अगदीच कोणी तातडीचा रुग्ण आला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? कोरोनाच्या काळात सर्वाधिक निधी खर्च करणाऱ्या जिल्हा परिषदेला या प्रकाराचीही जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
चौकट
गरज नसेल तर बंद करा
कोरोना रुग्णसंख्या कमी येत आहे. तेथे एकही रुग्ण दाखल नाही. मग कोविड सेंटरचा हा पांढरा हत्ती कोणासाठी पोसला जात आहे, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. जर गरजच नसेल, तर हे केंद्र बंद करा. रात्रीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांच्या जिवावर सेंटर उघडे टाकून जाणाऱ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे.
१६०९२०२१ कोल झेडपी १/२/३/४
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील कोविड सेंटरवर बुधवारी रात्री साडेनऊ वाजता एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचा हा पुरावा. बाहेर असलेल्या नोंदणी विभागात, आतील दालनामध्ये कोणीही हजर नाही. औषधे आणि ऑक्सिजनची सिलिंडरही उघड्यावरच ठेवण्यात आली आहेत. (छाया : आदित्य वेल्हाळ)