‘आॅपरेशन मुस्कान’द्वारे बेपत्ता मुलांचा शोध
By Admin | Updated: July 3, 2015 00:44 IST2015-07-03T00:44:52+5:302015-07-03T00:44:52+5:30
केंद्राची मोहीम : कोल्हापुरात प्रभावीपणे राबविणार

‘आॅपरेशन मुस्कान’द्वारे बेपत्ता मुलांचा शोध
कोल्हापूर : केंद्र सरकारने हरविलेल्या मुलांचा तातडीने शोध लागावा यासाठी १ ते ३१ जुलै दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान’ ही मोहीम हाती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे राबविण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी शंभरपेक्षा जास्त मुले हरवतात. पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद त्या दिवशी न होता दोन-चार दिवसांनी होते. त्यामुळे त्यांना शोधणं कठीण होतं. मूल हरवल्यानंतर तत्काळ नोंद केल्यास मूल सापडण्याची दाट शक्यता असते. याबाबत जागृती ‘आॅपरेशन मुस्कान’द्वारे करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्हास्तरावर सक्षमपणे राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पोलीस मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मोहिमेचा उद्देश स्पष्ट करून हरविलेल्या मुलांचा तत्काळ शोध घ्यावा, तसेच अशा प्रलंबित गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने तपास करून ते मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
‘आॅपरेशन मुस्कान’ म्हणजे काय?
ही मोहीम पोलीस श्रम विभाग, महिला व बालकल्याण विभाग संयुक्तपणे राबविणार आहे. जबरदस्तीने होणारी बालमजुरी आणि बालकांचे शोषण रोखणे, महिला आणि मुलींच्या तस्करीला पायबंद घालणे, महिला आणि तरुणींचा सुरक्षित प्रवास, त्यांना सन्मानजनक काम, रोजगाराची संधी यांचा या मोहिमेत समावेश आहे. या मोहिमेत सापडलेल्या मुलांची माहिती संबंधित राज्यांकडून महिला आणि बालकल्याण विभागाच्या ‘मिसिंग चाइल्ड’च्या पोर्टलवर अपलोड केली जाईल.