सामन्यासाठी निरोप समारंभ चुकवला
By Admin | Updated: December 18, 2014 00:30 IST2014-12-18T00:19:35+5:302014-12-18T00:30:19+5:30
यांनी घडविलाकोल्हापूरचा फुटबॉल...

सामन्यासाठी निरोप समारंभ चुकवला
एस.सी.सी वर्गाचा निरोप समारंभ शाळेत होता. माझे बंधू फुटबॉल चांगले खेळत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी मी जात असे. त्यात माझा फेव्हरेट संघ होता ‘शिवाजी’. त्यांचा सामना पाहण्यासाठी मी मॅट्रिकचा निरोप समारंभ चुकवला. पुढे याच संघातून माझी सीनियर संघात निवड झाली. त्यावेळच्या ज्येष्ठांनी माझी निवड केली.
बलाढ्य शिवाजी विरुद्ध ‘बालगोपाल’यांच्यात सामना झाला. सामन्यात माजी आमदार बाबूराव धारवाडे चक्क गोलरक्षक म्हणून माझ्यासमोर उभे होते. असे एक ना अनेक किस्से ‘आठवणीतील फुटबॉल’ सामन्याविषयी शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू व ज्येष्ठ प्रशिक्षक आप्पासाहेब वणिरे सांगत होते.
१९५३ मध्ये मी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्यावेळच्या मॅट्रिक परीक्षेला बसलो होतो. शेवटचे शाळेतील दिवस होते. साधारणत: फेबु्रवारीचा महिना होता. प्रथेप्रमाणे शाळेत मॅट्रिक परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ ठेवला होता. मात्र, मी शिवाजी आणि प्रॅक्टिस क्लब यांचा सामना रावणेश्वर तळ्यात असल्याने मी त्या समारंभालाच जाणे टाळले. त्यामुळे पुढे शाळेतही मला बोल खावा लागला. इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये फुटबॉलचे आकर्षण ठासून भरले होते.
१९५५ मध्ये बालगोपाल तालीम विरुद्ध आमच्या संघाचा सामना होता. समोर गोलरक्षक म्हणून बाबूराव धारवाडे होते. सामना रंगात आला होता. अटीतटीच्या सामन्यात मी गोल केला. हा सामना माझ्या फुटबॉल करियरमध्ये शेवटचाच ठरला. पुढे मी जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीला लागलो. त्यामुळे फुटबॉल खेळापासून दूर गेलो.
काही दिवसांनंतर मला फुटबॉलपासून दूर राहणे म्हणजे विरहासारखे वाटू लागले. त्यामुळे शिक्षकी पेशातील पुढचे शिक्षण घेऊन मी महाराष्ट्र हायस्कूलच्या माध्यमिक हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून १९७० पासून रूजू झालो.
शिवाजी तरुण मंडळाकडून १५ वर्षे फुटबॉल खेळल्यानंतर मला जाणीव झाली की, आता आपल्या पेठेतील मुलांना फुटबॉलचे तांत्रिक धडे देऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर न्यायचे.
मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठ येथील जी मुले अभ्यासात मंद, सामाजिकदृष्ट्या टाकाऊ, दंगेखोर, मारामाऱ्या, उनाडकी करणारी, शिक्षकांचा आदेश न मानणारी अशा मुलांना फुटबॉल खेळायला लावून मी पुढे आणले. त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. आजही मी सायंकाळी शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने पाहण्यास असतो. शाहू स्टेडियम म्हणजे ‘फुटबॉलची पंढरी’ आहे.
- शब्दांकन : सचिन भोसले