मिरज रेल्वे स्थानक, वसाहतीत पाणीटंचाई
By Admin | Updated: July 20, 2014 23:44 IST2014-07-20T23:30:10+5:302014-07-20T23:44:55+5:30
योजना बंद : रेल प्रशासनाची तारांबळ

मिरज रेल्वे स्थानक, वसाहतीत पाणीटंचाई
मिरज : रेल्वेची पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने मिरज रेल्वे स्थानकावर व कर्मचारी वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. मिरजेत पाणी नसल्याने हुबळी, निरा व पुणे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली.
मिरज स्थानकातून दररोज ६० रेल्वेगाड्या ये-जा करतात. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेसह पाणी भरण्याचे काम मिरजेत करण्यात येते. स्थानकालगत असलेल्या हैदरखान विहिरीतून मिळणारे पाणी अपुरे असल्याने पाच वर्षापूर्वी रेल्वेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. दररोज ४५ लाख लिटर पाणी उपसा व शुद्धीकरण करून रेल्वेगाड्यांना कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो.
शनिवारी रात्री कृष्णा नदीवरील पंपिंग स्टेशनवरील मोटार बंद पडल्याने स्थानकाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. स्थानकातून येणाऱ्या-जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना दरररोज तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे, तर रेल्वेस्थानकांत प्रवाशांना पिण्यासाठी, रेल्वेगाड्यांच्या स्वच्छतेसाठी व रेल्वे कर्मचारी वसाहतीला पुरवण्यासाठी उर्वरित पाण्याचा वापर केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने मिरज रेल्वेस्थानकात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती.
कृष्णाघाट पंपिंग स्टेशनमधील मोटार दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. रविवारी सकाळी मिरजेत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये हुबळी, निरा व पुणे स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली. प्लॅटफॉर्म तीन व चारवर हैदरखान विहिरीतील पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. प्लॅटफॉर्म एकवर मात्र पाणी नव्हते. कर्मचारी वसाहतीत आज पाणीपुरवठा बंद होता. सोमवारपर्यंत तो सुरळीत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा बंद असल्याने हुबळी व पुणे येथे एक्स्प्रेस गाड्या जादा वेळ थांबविण्यात आल्या. पाणीटंचाईमुळे प्रवाशांचे हाल झाले. (वार्ताहर)