मिरजेच्या युवकाचा गर्दीत गुदमरून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 00:45 IST2017-03-30T00:45:34+5:302017-03-30T00:45:34+5:30
पोर्ले तर्फ ठाणेत यात्रेत मिरवणुकीवेळी प्रकार

मिरजेच्या युवकाचा गर्दीत गुदमरून मृत्यू
पोर्ले तर्फ ठाणे/ मिरज : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील मसाईदेवीच्या यात्रेत निघालेल्या बैलगाडा मिरवणुकीवेळी झालेल्या गर्दीत युवकाचा गुदमरून मृत्यू झाला. जयराज सुनील साळोखे (वय १७, रा. मिरज) असे त्याचे नाव आहे. संबंधित घटनेची नोंद कोल्हापुरातील सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुढीपाडव्याला प्रत्येक वर्षी पोर्ले तर्फ ठाणे येथील मसाईदेवीची यात्रा भरते.
मिरजेतील पाटील हौद तालीम परिसरात राहणारा जयराज साळोखे हा येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. आसुर्ले-पोर्ले हे त्याचे आजोळ आहे. मंगळवारी यात्रा असल्याने मावसभावासह आणखी एका मित्राला घेऊन तो दुपारी तीनच्या दरम्यान आसुर्ले-पोर्लेला गेला होता.
मित्रांना घेऊन जयराज बैलगाडा मिरवणूक बघण्यासाठी सायंकाळी मामाच्या घरातून गेला होता. यात्रेत गाडे बघण्यासाठी यावर्षी मोठी गर्दी झाली होती. यात्रेत डीजीचा ताल व त्यावर नाचणाऱ्या नृत्यांगणा पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत जयराज व मित्र तल्लीन असताना मित्राची ताटातूट झाली. गर्दीच्या हेलकाव्यात जयरामचा पाय घसरला आणि तो गर्दीत तुडवला गेला. मित्रांनी त्याची शोधाशोध करून मामाच्या घरी त्याची वाट पाहू लागले. चेंगराचेंगरीत दम घुटलेल्या जयरामला काही लोकांनी उचलून घरात नेले. त्याच्याकडून वडिलांचा फोन नंबर विचारून फोन केल्यानंतरच जयरामच्या मामाला ठावठिकाणा समजला. जयरामने वडिलांचा फोन नंबर सांगून जीव सोडला. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले. पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मामाच्या गावाला यात्रा पाहण्यासाठी आलेल्या जयरामचा यात्रेतील मिरवणुकीच्या गर्दीत गुदमरून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, बहीण आहे. जयरामच्या घरची स्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. (वार्ताहर)