मिरजेत संगीत विद्यालय; चांदोलीला संग्रहालय--पर्यटन दिन विशेष

By Admin | Updated: September 27, 2014 00:12 IST2014-09-27T00:02:37+5:302014-09-27T00:12:23+5:30

पर्यटन वाढीला मिळणार चालना : जिल्ह्याचा ४२३ कोटींचा पर्यटन आराखडा तयार

Mirage Music School; Chandololi Museum - Tourism Day Special | मिरजेत संगीत विद्यालय; चांदोलीला संग्रहालय--पर्यटन दिन विशेष

मिरजेत संगीत विद्यालय; चांदोलीला संग्रहालय--पर्यटन दिन विशेष

नरेंद्र रानडे - सांगली जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असली तरी नियोजनाच्या अभावामुळे त्याकडे पर्यटक फारसे फिरकत नसल्याचे चित्र आहे. आता पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एम.टी.डी.सी.) पुढाकार घेतला आहे. पर्यटनस्थळांजवळ अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एम.टी.डी.सी.ने ४२३ कोटी रुपयांचा जिल्हा पर्यटन आराखडा तयार केला आहे. टप्प्या-टप्प्याने त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रशासनातर्फे जिल्ह्यात ४१ प्रमुख पर्यटनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. सर्वच पर्यटनस्थळांना विशेष महत्त्व आहे. असे असले तरीही, त्यांच्याकडे म्हणावा तसा पर्यटकांचा ओढा नाही. पर्यटकांना संबंधित पर्यटनस्थळी अत्यावश्यक सोयी मिळाव्यात, अशी अपेक्षा असते. परंतु जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्तेही सुस्थितीत नसल्याने पर्यटन वाढीवर विपरीत परिणाम होतो. जिल्हा प्रशासनातर्फे पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली जाते. परंतु त्यात सातत्य नाही.
आता पर्यटन वाढीला चालना मिळण्यासाठी एम.टी.डी.सी.ने जिल्हा पर्यटन आराखडा तयार केला आहे. त्यामुळे विविध पर्यटनस्थळे अद्ययावत करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यासाठी ३१ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. याअंतर्गत वन्यजीव संग्रहालय, वॉच टॉवर्स, चांदोली तलावाचे आधुनिकीकरण, पार्किंग सुविधा, निवासासाठी तंबू आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मिरजेत संगीत विद्यालय, संग्रहालय, संगीत ग्रंथालय आदींसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. दंडोबा डोंगरावर रॉक क्लायंबिंग, हॉर्स रायडिंगची सोय करण्याचा मानस आहे. सांगलीत एम.टी.डी.सी.चे अधिकृत निवासस्थान करण्याचे प्रस्तावित आहे.


जिल्ह्यात अनेक चांगली पर्यटनस्थळे आहेत. नागरिकांनी ती पाहण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासनदेखील प्रयत्नशील असून भविष्यकाळात पर्यटकांच्या संख्येत निश्चित वाढ होईल. जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार आहे.
- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.

सांगलीतील पर्यटनस्थळांना परजिल्ह्यातील पर्यटकांनी भेट देणे आवश्यक आहे. सांगलीबाहेर राहणाऱ्यांनी येथील माहिती देऊन सांगलीत येण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. संस्थेच्यावतीने आम्ही वर्षाला पाच हजार पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी प्रयत्न आहे.
- साईराज पाटील, सरचिटणीस, आम्ही सांगलीकर संस्था, मुंबई.

जिल्हा विपुल साधनसंपत्तीने नटलेला आहे. परंतु येथील पर्यटनस्थळांची योग्य प्रसिध्दी होत नाही. परिणामी पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा कमी आहे. एम.टी.डी.सी.ने तयार केलेल्या पर्यटन आराखड्यानुसार कार्यवाही सुरू केल्यास जिल्ह्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकेल.
- प्रदीप सुतार, व्याघ्र कक्ष समिती.

चांदोली राष्ट्रीय अभयारण्य, चांदोली धरण, बहे येथील रामलिंग बेट, आरेवाडीचे बिरोबा मंदिर, सागरेश्वर अभयारण्य, सांगलीचे गणपती मंदिर, दंडोबा डोंगर, शुकाचार्य, चौरंगीनाथ, रेवणसिद्ध.

Web Title: Mirage Music School; Chandololi Museum - Tourism Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.