मराठी चित्रपटांसाठी आता मिनीप्लेक्स

By Admin | Updated: June 8, 2016 00:34 IST2016-06-07T23:26:02+5:302016-06-08T00:34:53+5:30

महिन्याभरात अध्यादेश : निर्मात्यांचे आर्थिक नुकसान टळण्यास होणार मदत

Miniplex for Marathi movies now | मराठी चित्रपटांसाठी आता मिनीप्लेक्स

मराठी चित्रपटांसाठी आता मिनीप्लेक्स

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --मराठी चित्रपटसृष्टीत आता कोटींची उड्डाणे होत असली तरी दुसरीकडे केवळ वितरण व्यवस्था नसल्याने अनेक चित्रपट प्रदर्शनापर्यंतही पोहोचत नाहीत. ही दरी संपवत दर्जेदार मराठी चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षक मिळावा, यासाठी ‘मिनीप्लेक्स’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला असून, महिन्याभरात अध्यादेश निघण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने मरगळ झटकून सशक्त कथानक असलेले अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. कलात्मकता आणि व्यावसायिकता या दोन्हींचा मेळ साधलेल्या चित्रपटांनी हाऊसफुल्ल गल्ला जमवला आहे. एकीकडे अशी सकारात्मक बाजू असली तरी दुसरीकडे केवळ पैसा नाही किंवा वितरण व्यवस्था नाही म्हणून अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शनापर्यंतसुद्धा जात नाहीत. वर्षाला शंभर ते सव्वाशे चित्रपट सेन्सॉर होतात, त्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या ८० ते ९० इतकीच असते.
महाराष्ट्रात मराठीपेक्षा जास्त हिंदी चित्रपट पाहिले जातात; त्यामुळे हिंदी चित्रपटांनाच वितरकांकडून चित्रपटगृहे दिली जातात. परिणामी, मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीत. एका चित्रपटगृहाची प्रेक्षक क्षमता ५०० ते १००० पर्यंत असते. एवढ्या मोठ्या संंख्येचे चित्रपटगृह घ्यायचे; पण प्रेक्षक शंभर ते दोनशे असतात. चित्रपटगृह मिळालेच आणि चित्रपट चालला नाही, तर निर्मात्यांना वितरणाचा, चित्रपटगृहांचा आर्थिक भुर्दंड बसतो. एकदा नुकसान झाले की, पुन्हा तो निर्माता दुसरा मराठी चित्रपट काढायला धजत नाही.
हा प्रश्न सोडवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने राज्य शासनाकडे ‘मिनीप्लेक्स’ ही संकल्पना मांडली आहे. यामुळे चित्रपटगृहांचा प्रश्न मिटणार आहे. वितरणासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार नाही आणि चित्रपट चालला नाही तर निर्मात्यांचे फार मोठे नुकसान होणार नाही. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी या संकल्पनेला हिरवा कंदील दाखविला आहे.

नियम शिथिलीकरणासाठी प्रयत्न
चित्रपटगृहाच्या जागेवर अन्य व्यवसाय केले जाऊ नयेत, असा शासनाचा नियम आहे. त्यामुळे बंद पडलेली चित्रपटगृहे पडीक अवस्थेत आहेत. हा नियम शिथिल करावा, अशी मागणी चित्रपट महामंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. म्हणजे बंद पडलेल्या चित्रपटगृहांच्या जागी मिनीप्लेक्स उभारले जावे आणि उर्वरित जागेत मालकांना अन्य कोणताही व्यवसाय करण्याची मुभा असावी.


काय आहे ‘मिनीप्लेक्स’
मिनीप्लेक्स म्हणजे शंभर ते दीडशे प्रेक्षक क्षमता असलेले लहान चित्रपटगृह. त्यासाठी वेगळी जागा घेऊन चित्रपटगृह उभारावे लागेल, असे नाही.


त्या हॉलमध्ये आवश्यक असणारा बंदिस्तपणा, खुर्च्या आणि चित्रपट प्रदर्शनासाठी लागणाऱ्या साहित्यांची व्यवस्था करू शकणारी व्यक्ती मिनीप्लेक्स उभारू शकते.
कोणाचा घरी इतक्या मोठ्या क्षमतेचा हॉल असेल किंवा मंगल कार्यालये, संस्थांचे हॉल, अशा कोणत्याही ठिकाणी मिनीप्लेक्स उभारता येईल.

Web Title: Miniplex for Marathi movies now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.