असमतोल विकासकामांची 'खण'-- प्रतिबिंब प्रभागाचे प्र. क्र.३५ (माळी कॉलनी)
By Admin | Updated: December 23, 2014 23:41 IST2014-12-23T23:28:16+5:302014-12-23T23:41:29+5:30
जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप : मोकाट जनावरे, कचऱ्याची समस्या, तर उच्चभ्रू वसाहतीत बागेची मागणी--

असमतोल विकासकामांची 'खण'-- प्रतिबिंब प्रभागाचे प्र. क्र.३५ (माळी कॉलनी)
कोल्हापूर : उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय कुटुंबांसह कष्टकरी लोकांची वस्ती असा संमिश्र स्वरुपाचा प्रभाग म्हणून टाकाळा खण, माळी कॉलनी म्हणजे प्रभाग क्रमांक ३५ ओळखला जातो. येथील लोकांच्या वेगवेगळ््या राहणीमानाप्रमाणे त्यांच्या समस्याही तितक्याच वेगवेगळ्या आहेत. विद्यमान नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी मोबाईलच्या रेंजप्रमाणे प्रभागातील काही भागात फुल्ल रेंजने काम केले आहे, तर काही भागातील त्यांचे काम ‘नॉट रिचेबल’ आहे.
माळी कॉलनी, विश्वनाथ हौसिंग सोसायटी, मंडलिक पार्क, शिरगावकर सोसायटीसह टाकाळा झोपडपट्टी, टाकाळा खण असा परिसर या प्रभागात येतो. येथील नागरिकांच्या प्रमुख समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, मोकाट जनावरे आणि कचरा उठावाचा प्रश्न. याच प्रमुख समस्यांनी हा प्रभाग वेढला गेला आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी असे तिन्ही वर्ग या प्रभागात येतात. विद्यमान नगरसेवकांनी काही भागात नियमित भेटीसह विकासकामे केल्याचे दिसून येते, त्यांना ठराविक भागात मोठ्या प्रमाणात कामे केल्याचे चित्र आहे. तर काही भागाकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, अशी ओरड येथील नागरिकांमधून होत आहे.
माळी कॉलनी, पी.डब्ल्यू.डी. सोसायटी, भारत हौसिंग सोसायटी, शिरगावकर हौसिंग सोसायटी यासारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते झाले आहेत. तसेच येथील कचरा उठावही केला जातो. पाणी पुरवठ्याची सोयदेखील उत्तम आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांची सकाळी व सायंकाळी फिरण्यास जाण्यासाठी, तसेच मुलांना खेळण्यासाठी प्रभागात एक बाग हवी, अशी मागणी आहे. मात्र, ही बाग बांधण्यासाठी विद्यमान नगरसेवक कोणतीच हालचाल करीत नाहीत, असा आक्षेप येथील नागरिकांमधून व्यक्त होतो आहे.
प्रभागातील मध्यमवर्गीय लोकांची समस्या म्हणजे परिसरातील मोकाट जनावरे खास करून भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि कचरा उठाव हीच होय. नळाला पाणी येते; मात्र ते अत्यंत कमी दाबाने, याबाबत वारंवार तक्रारी करून नगरसेवक वा प्रशासन याकडे फारसे गांभीर्याने पाहात नसल्याने नागरिकांमधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
या परिसरातील काही भागात एलईडी लाईट लावल्या आहेत, तर काही भागातील खांबांवर विजेची सोयसुद्धा नाही, अशी अवस्था आहे.
प्रभागातील टाकाळा खण झोपडपट्टी, जामसांडेकर झोपडपट्टीत तर समस्याच समस्या आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा प्रश्न, अपुरा पाणीपुरवठा, वेळच्यावेळी कचरा उठाव होत नाही. त्यामुळे विद्यमान नगरसेवक झोपडपट्टी परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा आरोप येथील नागरिक करतात. या भागात स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे; मात्र त्या ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा असल्याने नागरिक त्याकडे पाठ फिरवत आहेत. नगरसेवक फक्त काही भागांसाठीच काम करतात. त्या ठिकाणीच वारंवार भेट देतात; मात्र आमच्या परिसरात फिरकतसुद्धा नाहीत. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची? असाही प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यांनी येथील समस्या सोडवण्यासाठी देखील वेळ द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. ( प्रतिनिधी )े
विद्यमान नगरसेवक विजय सूर्यवंशी
प्रभागातील समस्या
काही भागात कामे तर काही भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
मोकाट जनावरे, कचऱ्याची मुख्य समस्या
झोपडपट्टी परिसरात पायाभूत सुविधांची वाणवा
उद्यानाची मागणी प्रलंबित
विकासकामांचा दावा
अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण
पाण्याच्या पाईपलाईनचे काम
पे अँड टॉयलेटची सुविधा उपलब्ध
जलतरण तलावाजवळ बागेचे काम सुरू करण्यात येणार असल्याचा दावा
मी निवडून येण्यापूर्वी येथे अंतर्गत रस्त्यांची समस्या खूप होती. त्यामुळे प्राधान्याने अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. तसेच माळी कॉलनीत पाईपलाईनचे काम झाले आहे. झोपडपट्टी वस्तीमध्ये अंतर्गत गटारी केल्या आहेत. जामसांडेकर झोपडपट्टीत १० लाखांचे पे अॅन्ड टॉयलेट उभारण्यात आले. तसेच भागातील ४०० व्हॅटच्या मर्क्युरी बल्बऐवजी ९० व्हॅटचे एल.ई.डी. बसवून विजेची बचत केली आहे. प्रभागातील जलतरण तलाव येथे बागेचे काम करण्यात येणार आहे. अशी एकूण सुमारे चार कोटींची कामे प्रभागात केली आहेत. अजून काही कामे प्रलंबित आहेत, ती लवकरच पूर्ण के ली जातील.
- विजय सूर्यवंशी, नगरसेवक
श्रीकृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्था येथील परिसरात कचरा उठाव वेळच्या वेळी होत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाची साफसफाई केली जात नाही. पाण्याचा तर प्रश्न कधीच सुटलेला नाही. वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणी आमची दखल घेत नाहीत - प्रवीण वायदंडे
नगरसेवकांची प्रभागात भेट असते. कचरा उठाव केला जातो. तसेच अंतर्गत रस्त्यांची डागडुजी झालेली आहे. मात्र, रात्री मोकाट कुत्र्यांचा त्रास परिसरात मोठ्या प्रमाणात होतो. रात्री ही कुत्री कळपाने दुचाकींच्या मागे लागतात. त्यामुळे अपघातांचे प्रकार घडले आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. - अल्ताफ मुजावर