मिनीबसला टँकरची धडक; पाच ठार

By Admin | Updated: December 7, 2014 00:47 IST2014-12-07T00:41:57+5:302014-12-07T00:47:29+5:30

कऱ्हाडजवळ अपघात : सर्वजण राजस्थानमधील; इचलकरंजीहून शिर्डीला जाताना काळाचा घाला

Minibus hit by tanker; Five killed | मिनीबसला टँकरची धडक; पाच ठार

मिनीबसला टँकरची धडक; पाच ठार

कऱ्हाड/मलकापूर : शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी मिनीबसला टँकरने पाठीमागून जोरदार धडक दिली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात ७ वर्षाच्या बालिकेसह पाचजण जागीच ठार झाले, तर १० भाविक गंभीररीत्या जखमी झाले़ जखमींवर कऱ्हाडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील जखमी व मृत मूळ राजस्थानचे असून, दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी ते रेल्वेने इचलकरंजी येथे आले होते. तेथून शुक्रवारी रात्री भाडेतत्त्वावर खासगी मिनीबस घेऊन हे भाविक शिर्डीला जाण्यासाठी निघाले. मात्र, अर्ध्या वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
दीपिका प्रकाश शर्मा (वय ७) या बालिकेसह तिची आई माया प्रकाश शर्मा (३५), सीता शंकरलाल चौधरी (५०), त्यांचे पती शंकरलाल उग्राराम चौधरी (५५) व संपतीबाई अमरचंद जहांगीड (४५, सर्व रा. अनंतापूर राजस्थान) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत़
अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे राजस्थान येथील असलेले ओझा कुटुंबीय इचलकरंजीमध्ये वास्तव्यास आहेत. अनंतापूर-राजस्थान येथील त्यांचे नातेवाईक शर्मा, जहांगीड व चौधरी या तीन कुटुंबांतील सुमारे १७ सदस्य २० दिवसांपूर्वी राजस्थानवरून दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी आले होते़ त्यांनी यापूर्वी जगन्नाथपुरी, बालाजी, रमेश्वरपूरम, कन्याकुमारी व महालक्ष्मी-कोल्हापूर हा प्रवास रेल्वेने पूर्ण केला होता़ ते शुक्रवारी रात्री इचलकरंजी येथून मिनीबस (एम़ एच़ १४ पी़, ८०८७) मधून देवदर्शनासाठी शिर्डीला निघाले होते़ शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील तळबीड येथे पोहोचले. लघुशंकेला जाण्यासाठी चालकाने बस महामार्गाकडेला थांबविली. त्यावेळी काही प्रवाशांसह चालकही बसमधून खाली उतरला़ नंतर चार प्रवासी सोडून इतर सर्वजण पुन्हा बसमध्ये जाऊन बसले़ त्याचवेळी कोल्हापूरहून मुंबईकडे भरधाव निघालेल्या दूध टँकरने (जी़ जे़ २३ एक्स, ६१६५) बसला पाठीमागून जोरदार धडक दिली़ त्यामुळे टँकरसह मिनीबसही महामार्गावरच उलटली.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थ व महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी रक्त व मांसाचा सडा पडलेला होता. अपघाताची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.
दहाजण गंभीर जखमी
दशरथमल सखाराम शर्मा (वय ६४), गीता दशरथमल शर्मा (४०), प्रकाश बाबुलाल शर्मा (३६), पवन दशरथमल शर्मा (२५), अरचंद बबुतराम जहांगीड (५२) मंजुदेवी सुरेश उपाधी (५२), कमलादेवी तेजपाल उपाधी (५५, सर्व रा. अनंतापूर, राजस्थान), विनोद गोपालजी ओझा (९), पूजा गोपालजी ओझा ( १७), विमल सतनारायण ओझा (६५) (तिघेही रा. इचलकरंजी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत़
इचलकरंजीत शोककळा
इचलकरंजी : अपघातग्रस्त हे काळू केटीन (मेडला सिटी, जि. नागौर, राजस्थान) येथील असून, ते इचलकरंजी येथे नातेवाइकांकडे आले होते. अपघाताचे वृत्त समजताच लिंबू चौकात शोककळा पसरली.
काळू मेटीन (मेडला सिटी) येथील रहिवासी जोशी कुटुंबीय तिरुपती-बालाजी येथे जाऊन ४ डिसेंबरला इचलकरंजीत पवन शर्मा (रा. लिंबू चौक) यांच्याकडे आले होते. अपघातात जखमी झालेले दशरथमल व गीता शर्मा हे पवन यांचे माता-पिता होत. शर्मा कुटुंबीय ८ डिसेंबरला राजस्थानला महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाणार होते. दरम्यान, ते देवदर्शन करण्यासाठी शिर्डीला निघाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Minibus hit by tanker; Five killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.