नागरिकांच्या सोयीसाठी ‘मिनी महापालिका’
By Admin | Updated: April 8, 2015 23:59 IST2015-04-08T23:46:58+5:302015-04-08T23:59:21+5:30
आयुक्तांची अभिनव संकल्पना : नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचा अंमल सुरू

नागरिकांच्या सोयीसाठी ‘मिनी महापालिका’
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालयांतर्गत नागरिकांंच्या कामांचा निपटारा वेळेत होत नाही. परिणामी बांधकाम परवानगीसह लहान-सहान कामांसाठीही नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. प्रशासन जलद व पारदर्शक करण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘मिनी महापालिका’ ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे. सहायक आयुक्त उमेश रणदिवे व शीला पाटील यांच्यात कार्यालयांची विभागणी करून कार्यालयांच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
‘नागरिकांच्या कामात दिरंगाई कराल तर पगाराला मुकाल,’ अशी तंबीच आयुक्त पी. शिवशंकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट अशा चार विभागीय कार्यालयांमार्फत चालते. महापालिकेच्या मुख्य कार्यालयांपासून काहीशा दूरच्या अंतरावर असणारी ही कार्यालये म्हणजे ‘संस्थाने’च झाली आहेत. सहा-सहा महिने हेलपाटे मारल्याशिवाय नागरिकांची कामेच होत नाहीत. चिरीमिरी हा तर अलिखित नियमच बनला आहे. नागरिकांना तक्रारीसाठी थेट उपायुक्त किंवा आयुक्त यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तक्रारीची मुभा नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी मोकाटच होते.
या सर्व प्रकारांवर आळा बसावा, नागरिकांना तक्रारीस मुभा मिळावी, त्यांचे निराकरण व्हावे यासाठी सहायक आयुक्त उमेश रणदिवे
व शीला पाटील यांच्याकडे दोन-दोन कार्यालयांची जबाबदारी सोपविली आहे. हे अधिकारी अचानक कार्यालयास भेटी देणार आहेत.
तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. महापालिकेच्या पहिल्या टप्प्यातील ‘मिनी महापालिका मिशन’ची सुरुवात झाली आहे. नागरिकांची कामे व तक्रारींचे निवारण
त्या-त्या विभागीय कार्यालयातच व्हावे, यासाठी उपशहर अभियंत्यांच्या अधिकारांतही वाढ करण्यात
आली आहे. रणदिवे व शीला
पाटील यांनी कामास सुरुवात
केली असून, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. (प्रतिनिधी)