कोपार्डे बाजारात लाखोंची उलाढाल
By Admin | Updated: October 18, 2015 23:41 IST2015-10-18T23:25:32+5:302015-10-18T23:41:34+5:30
जनावरांच्या बाजारास प्रतिसाद : ४० हजारांचा बोकड, ९० हजारांची एचएफ गाय

कोपार्डे बाजारात लाखोंची उलाढाल
प्रकाश पाटील -कोपार्डे--दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोपार्डेतील जनावरांच्या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झालेली पाहायला मिळाली. जातिवंत जनावरांबरोबर अनुशंगिक व्यापारातही मोठी वाढ झाली आहे. यात भाजीपाला, मसाल्याचा बाजार, मिरची बाजार यामुळे बाजाल फुलला होता. सुगीचा हंगाम असताना साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसवाहतूक करणाऱ्या शेतकरी व ऊस वाहतूकदारांकडून बैलांच्या खरेदीसाठी सध्या झुंबड सुरू आहे. याचा परिणाम जातिवंत बैलजोडीबरोबर सर्वसामान्य असणाऱ्या बैलजोडीला मोठी किंमत मोजावी लागत आहे. जातिवंत बैलांच्या किमती लाखमोलाच्या घरात पोहोचल्या आहेत. जातिवंत खिलारी जोडीचा दर दीड लाख रुपये सांगण्यात आला होता. कोपार्डे येथील बाजीराव पाटील यांच्या डौलदार खिलारी जोडीवर बाजारातील इच्छकु खरेदीदार शेतकऱ्यांच्या नजरा होत्या.
संकरित दूध जनावरांत दिवसाला बावीस लिटर दूध देणाऱ्या एचएफ गायीला पुनाळ (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्याने ९० हजार रुपये किंमत सांगितली. या गायीची ८० हजारांत खरेदी करण्यात आली, तर शुद्ध मुऱ्हा जातीच्या दिवसाला १७ लिटर दूध देणाऱ्या म्हशीची किंमत एक लाख रुपये सांगितली. सर्वसामान्यपणे जनावरांच्या किमती ५० हजारांपासून सुरू होत असल्याने आर्थिकदृष्ट्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे.
सध्या दसऱ्यानंतर होणाऱ्या यात्रा व मोहरम एकाच वेळी आल्याने बकऱ्यांच्या बाजारालाही मोठी तेजी होती. ५० किलो वजनाच्या बोकडाला ४० हजारांची किंमत सांगण्यात येत होती, तर बकऱ्याला ३५ हजाराला खरेदी करण्यात आले. फारच तेजीत बाजार असला तरी खरेदीदारांची कोणतीच कमी नव्हती. साखर कारखान्यांचे हंगाम, शेतीची कामे यासाठी बैलांची, तर दुधाळ जनावरांसाठीही शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होती.
या बाजारात अनुषंगिक शेती कामासाठी वापरावी लागणारी अवजारे, भाजीपाला आणि इतर व्यापारांतही मोठी उलाढाल होताना दिसत होती.