एसएमएसद्वारे कोट्यवधींचा गंडा
By Admin | Updated: August 24, 2015 00:35 IST2015-08-24T00:34:51+5:302015-08-24T00:35:48+5:30
चेन्नईतील चौघांवर गुन्हा : गुंतवणूकदारांकडून कार्यालयाची तोडफोड

एसएमएसद्वारे कोट्यवधींचा गंडा
कोल्हापूर : आॅनलाईन कंपन्यांची मोबाईल एसएमएसद्वारे जाहिरात करण्यासाठी दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून चेन्नई येथील चौघा भामट्यांनी सहा जिल्ह्यांतील दीड हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले.
या प्रकाराची माहिती गुंतवणूकदारांना समजताच त्यांनी संतप्त होत न्यू शाहूपुरीतील कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी (पान ९ वर)
एका एसएमएसला दोन रुपये
गुंतवणूकदाराने एक रुपयाप्रमाणे ५ हजार रुपये गुंतवणूक केली की, कंपनी त्यांना पाच हजार ‘एसएमएस’चे पॅकेज देत होती. त्यानंतर गुंतवणूकदाराने हे एसएमएस पंधरा दिवसांत इतर ग्रुप मोबाईलवर पाठविल्यास कंपनीकडून एका एसएमएसमागे दोन रुपयांप्रमाणे दहा हजार रुपये गुंतवणूकदाराला दिले जात होते. पंधरा दिवसांत दामदुप्पट पैसे मिळू लागल्याने या कंपनीकडे गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागली.
संशयित आरोपी संदीप रेड्डी, वेल कृष्णन, चैतन्य, कुमार पांडे (सर्व रा. सेंट मेरी रोड, पेराम्बूर, चेन्नई) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या चौघांच्या विरोधात सर्व पुरावे गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे सादर केले आहेत. त्यानुसार पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत.
संदीप रेड्डी, वेल कृष्णन, चैतन्य, कुमार पांडे या चौघांनी दि. १ जून २०१५ रोजी न्यू शाहूपुरी परिसरातील शारदा चेंबर्समध्ये पहिल्या मजल्यावरील कार्यालयात ‘व्हिजन मीडिया आयटी सोल्युशन फर्म’ नावाने कंपनी सुरू केली. या आॅनलाईन जाहिरात कंपनीची स्थानिक वर्तमानपत्रांतून जाहिरात केली. यावेळी आठ तरुणींची नेमणूक केली. जगभरातील १९ कंपन्यांचे आॅनलाईन जाहिरातीचे टेंडर घेतल्याचे सांगून त्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील गुंतवणूकदारांना पंधरा दिवसांत दामदुप्पट पैसे मिळविण्याची भुरळ घातली. त्यांच्या या आमिषाला सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त तरुणांनी एसएमएस सेंडिंग वर्कसाठी कमीत कमी पाचशे रुपयांपासून ते १ लाखापर्यंत गुंतवणूक केली.
दरम्यान, रविवारी नेहमीप्रमाणे कर्मचारी कार्यालयात आले असता ते बंद होते. त्यानंतर त्यांनी संदीप रेड्डी व वेल क्रिशनन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. ते चौघे राहत असलेल्या ताराबाई पार्क येथील फ्लॅटवर कर्मचारी गेले असता त्यालाही टाळे ठोकल्याचे दिसले. येथील वॉचमनकडे चौकशी केली असता शनिवारी रात्री हे चौघे पसार झाल्याचे सांगितले. या प्रकाराची माहिती कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना दिली. त्यानुसार शंभरपेक्षा जास्त गुंतवणूकदार कार्यालयासमोर जमले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेत संतप्त गुंतवणूकदारांना शांत केले. त्यानंतर या चौघांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी सर्वजण शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सर्वांशी चर्चा करून ठाणे अंमलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुंतवणूकदार बाबासाहेब नारायण निवळे (वय ३५, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली. सर्व गुंतवणूकदारांना मूळ कागदपत्रे घेऊन आज, सोमवारी पोलीस ठाण्यात बोलाविले आहे. (प्रतिनिधी)
१५ हजार रुपयांत एजन्सी
सहा जिल्ह्णांत या चौघांनी लोकांकडून पंधरा हजार रुपये घेऊन एजन्सी स्थापन केल्याचे समजते. या भामट्यांनी कोल्हापुरातील एका गुंतवणूकदाराला एजन्सी देऊन सुमारे पाच लाखाला गंडा घातल्याची तक्रार दाखल झाली आहे.
नॅशनल बँकेत खाते
या चौघा संशयितांनी शहरातील एका बँकेत कंपनीचा संचालक वेल क्रिशनन याच्या नावे तर दुसऱ्या बँकेत कर्मचारी कुंतीनाथ भोसले (रा. उचगाव) याच्या नावे खाते उघडले होते. या दोन्ही खात्यांवर रोज लाखोंची उलाढाल झाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
घर मालकावर कारवाई
चौघे भामटे ताराबाई पार्क येथील अपार्टमेंटमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये राहत होते. या फ्लॅट मालकाने परराज्यातील लोक आपल्याकडे राहत असल्याची पूर्वकल्पना शाहूपुरी पोलिसांना दिली नव्हती तसेच कार्यालयाच्या मालकानेही दिली नव्हती. त्या दोघांच्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.