लाखो डोळ्यांनी पाहिला रिंगण सोहळा

By Admin | Updated: July 19, 2015 00:33 IST2015-07-19T00:33:29+5:302015-07-19T00:33:29+5:30

‘ज्ञानोबा माउली’चा जयघोष : चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण उत्साहात

Millions of eyes have seen the redone ceremony | लाखो डोळ्यांनी पाहिला रिंगण सोहळा

लाखो डोळ्यांनी पाहिला रिंगण सोहळा

तरडगाव :
याचि देही, याचि डोळा
आगा पाहिला मी
माउलींचा रिंगण सोहळा...!
टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माउली-माउली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि उत्सुक नजरा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला. हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी डोळ्यांत साठविला.
लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम आटोपून माउलींची वारी शनिवारी दुपारी एक वाजता तरडगावकडे मार्गस्थ झाली. फलटण तालुक्याच्या सीमेवर सरहदेचा ओढा येथे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, तहसीलदार विवेक जाधव, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, गटविकास अधिकारी नीलेश काळे, पंचायत समितीचे सदस्य दिलीप अडसूळ, आदींनी पालखीचे स्वागत केले. माउलींचा मानाचा नगारखाना दुपारी तीनला रिंगणस्थळी आला, तेव्हा पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. या पावसाच्या सरीतच वारकऱ्यांनी नाचण्यास सुरुवात केली. सायंकाळी चारला चांदोबाचा लिंब येथे पोहोचल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले.
रिंगणाचा सोहळा याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लोक आले होते. धावत येणारा माउलींचा अश्व पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा आतुर झाल्या होत्या. अशातच माउलींचा अश्व व स्वाराचा अश्व एकमेकापाठोपाठ धावत आले. रथापुढील २७ दिंड्या व मागील २० दिंड्यांपर्यंत धावत गेल्यावर पुन्हा अश्व रथाकडे वळून, त्यातील पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी अश्वांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी धाव घेत चार वाजून २० मिनिटांनी वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अश्वांच्या टापांची माती ललाटी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. यावेळी असंख्य वारकरी पारंपरिक खेळ खेळण्यात दंग होते. त्यानंतर डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भागवत पताका घेऊन वैष्णव ‘ग्यानबा-तुकाराम’ असा जयघोष करत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Millions of eyes have seen the redone ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.