शिरोळ तालुक्यात पुन्हा दूध माफिया शिरजोर

By Admin | Updated: July 14, 2015 19:48 IST2015-07-14T19:48:26+5:302015-07-14T19:48:26+5:30

दूध भेसळ यंत्रणा पुन्हा कार्यरत : अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Milk Mafia Sharjor again in Shirol taluka | शिरोळ तालुक्यात पुन्हा दूध माफिया शिरजोर

शिरोळ तालुक्यात पुन्हा दूध माफिया शिरजोर

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यात दूध भेसळ करणाऱ्या यंत्रणेने पुन्हा आपले पाय पसरले आहेत. चिंचवाड, गणेशवाडी, भैरेवाडी, अकिवाट येथील मोठ्या कारवाईचा अपवाद वगळता आजपर्यंत तालुक्यात दूध भेसळ प्रकरणी जुजबी कारवाई झाल्यामुळे भेसळ करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत. याबाबतीत लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून, यामुळे या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अन्न व औषध भेसळ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या यंत्रणेच्या मुळाशी जाऊन ठोस कारवाई करण्याची गरज आहे.
शिरोळ तालुक्यात पाण्याची प्रचंड उपलब्धता, सुपीक जमीन आणि अनुकूल वातावरणामुळे हा तालुका सुजलाम्-सुफलाम् बनला आहे़ सन २००५ आणि त्यानंतरच्या प्रलयकारी महापुरामुळे तालुक्याची अपरिमित हानी झाली़ यातूनही जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर तालुक्याने पुन्हा उभारी घेतली़ शेती हा मुख्य व्यवसाय असला, तरी ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय हा जनतेच्या संसाराच्या गाड्याला आधारवड ठरला आहे़ सुरुवातीला दुय्यम मानण्यात येणारा दुग्ध व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा बनला आहे़ मात्र, याच दुग्ध व्यवसायातून कमी वेळेत जादा पैसे मिळविण्याचा उद्योग काही जणांकडून पुन्हा सुरू झाला आहे़ दूध भेसळीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळविण्यासाठी पर्याय शोधला जात असून, दूध भेसळ करणाऱ्या यंत्रणेने आपले पाय पसरले आहेत़
झटपट पैसे मिळविण्याच्या उद्देशाने काहींनी दूध भेसळीचे प्रकार सुरू केले आहेत़ बंद असलेली दूध भेसळ पुन्हा सुरू झाली आहे़ कर्नाटक सीमा भागातूनही भेसळीचे दूध शिरोळ तालुक्यात येते़ याच पद्धतीने शिरोळ तालुक्यातून आता मोठ्या प्रमाणात भेसळीचे दूध पाठविले जात आहे़ यावर अन्न व भेसळ विभागाकडून केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे काहीच झालेले नाही़ वर्षानुवर्षे सुरू असणाऱ्या या दूध भेसळ प्रकरणाचे पुढे काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे़ कठोर कारवाई अभावी दूध माफिया मोकाट फिरत आहेत़
दूध भेसळ करणाऱ्या या धेंड्यांच्या मुळाशी पोहोचून संपूर्ण यंत्रणाच उद्ध्वस्त करून टाकणे गरजेचे आहे़ तरच ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल. अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतो, यावरच कारवाई अवलंबून राहणार आहे.


भेसळ दुधाची पद्धत
भेसळ दूध तयार करण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. पामतेल, दुधाची भुकटी व केमिकलच्या सहायाने हे दूध तयार केले जाते़ हे दूध तयार करण्यासाठी काही रुपयेच मोजावे लागतात़ मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याच्या या प्रकारातून पुन्हा मोठी माया जमविली जात आहे.

नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
यापूर्वी तालुक्यात गणेशवाडी, भैरेवाडी, अकिवाट, चिंचवाड येथे दूध भेसळ प्रकरणी कारवाई झाली़ मात्र, याचे पुढे काय झाले याचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे़ यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Milk Mafia Sharjor again in Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.