राम मगदूमगडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणेच जिल्हा सहकारी दूध संघ तथा ‘गोकुळ’मध्येही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला सर्वसाधारण प्रवर्गातील हक्काचे एक संचालकपद मिळावे तसेच दूध पुरवठ्याच्या प्रमाणात संबंधित तालुक्याला जादा प्रतिनिधित्व मिळायला हवे. त्यानुसार मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या वार्षिक सभेत एकमताने ठराव करून त्याची अंमलबजावणी आगामी निवडणुकीपासूनच करावी, अशी जिल्ह्यातील दूध संस्थांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर व सहकाऱ्यांनी गुजरातमधील ‘आनंद डेअरी’च्या धर्तीवर ‘गोकुळ’च्या विकासाचे स्वप्न पाहिले. मात्र, सत्तेच्या साठमारीमुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही. त्यामुळे ‘अमूल’सह बाहेरून आलेल्या बड्या संस्थांशी स्पर्धा करताना कसरत करावी लागत आहे.३१ मार्च २०२५ अखेर गाय व म्हैस दूध मिळून एकूण १५ लाख ९४ हजार ४४० लिटर्स दुधाचे संकलन झाले. त्यामध्ये जिल्ह्यातून ११ लाख ८८ हजार ३६४, सांगली जिल्ह्यातून ८२,४५२, सोलापूर जिल्ह्यातून ९२,८३५ तर कोकणातून पुरवठा झालेल्या दुधाचाही समावेश आहे.दरम्यान, मुुंबईसह राज्यभरात ‘गोकुळ’च्या म्हैस दुधाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यासाठी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी संघातर्फे ‘हरियाणा’ व ‘गुजरात’मधून आणल्या जाणाऱ्या म्हशींसाठी ५० हजारांचे अनुदान जाहीर केले आहे. परंतु, स्पर्धा झाल्याशिवाय दूध संकलनात वाढ शक्य नसल्यामुळे दुधाच्या प्रमाणात ‘संचालकपद’ही विभागून देण्याची गरज आहे.
संपर्क सभेत जाब विचारलादर्जेदार म्हैस दुधामुळेच नामवंत ब्रॅण्ड म्हणून ‘गोकुळ’ नावारूपाला आले आहे; मात्र सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या गडहिंग्लज विभागाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याबाबतचा जाब गडहिंग्लज व चंदगडमधील संपर्क सभेत संचालक मंडळाला विचारला गेला आहे.
राखीव जागा विभागून द्याव्यातसत्तेच्या राजकारणासाठी एका गावात डझनभर दूध संस्थांची नोंदणी झाली आहे. मात्र, अपेक्षित दूध पुरवठा होत नसल्याने त्या संस्था केवळ निवडणुकीतील ठरावापुरत्याच असल्याचे चित्र आहे. म्हणूनच, सर्वसाधारण गटातील जागा वगळता राखीव प्रवर्गातील जागा दूध पुरवठ्याच्या निकषावर विभागून द्याव्यात.२०२४-२०२५ : तालुकानिहाय सरासरी दूध पुरवठा असा
- आजरा : ४१४२३
- भुदरगड : ७६६३९
- चंदगड : ९३५७३
- गडहिंग्लज : ८६७९५
- गगनबावडा : १६४५८
- हातकणंगले : ६६८७२
- कागल : १६७०३८
- करवीर : २२५९८०
- पन्हाळा : १२११३७
- राधानगरी : ११९१९९
- शाहूवाडी : ७४७७७
- शिरोळ : ९८४६८
- एकूण : ११,८८,३६४
‘गोकुळ’च्या सध्याच्या कार्यकारिणीत गडहिंग्लज, चंदगड, आजरा व शिरोळ तालुक्यांचा प्रतिनिधी नसल्याने दूध संस्थांसह दूध उत्पादकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ‘केडीसीसी’प्रमाणे प्रत्येक तालुक्याला एक हक्काचे आणि दुधाच्या प्रमाणात वाढीव संचालकपद मिळायला हवे. - संग्रामसिंह कुपेकर, अध्यक्ष श्रीकृष्ण दूध संस्था, कानडेवाडी