दुधाची विक्री एका ठिकाणीच करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:05+5:302021-05-20T04:25:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या घरी जाऊन दूध विक्री करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे. ...

Milk can be sold in one place | दुधाची विक्री एका ठिकाणीच करता येणार

दुधाची विक्री एका ठिकाणीच करता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांच्या घरी जाऊन दूध विक्री करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे. आता एकाच ठिकाणाहून विक्री करण्याची मुभा विक्रेत्यांना असणार आहे. त्यामुळे दूध विक्री न करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी मागे घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रविवार (दि. १६) पासून कडक लॉकडाऊन केले आहे. यातून दूध व मेडिकलला सूट देण्यात आली असली तरी, दूध विक्री ही ग्राहकांना घरपोहोच करण्याचे आदेश प्रशासनाचे होते. मात्र कोल्हापूर शहरातील एका-एका दूध विक्रेत्याकडे २०० पासून १ हजार लिटरपर्यंत दूध असते. ते प्रत्येकाच्या घरी सकाळच्या दोन-तीन तासात पोहोच करणे अशक्य असते. त्यामुळे एका ठिकाणी बसूनच दुधाची विक्री सुरू होती. त्यावर महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली. दंडात्मक कारवाईमुळे विक्रेत्यांनी ‘गोकुळ’ प्रशासनाकडे तक्रार केली होती. यावर बुधवारी ‘गोकुळ’चे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर एका ठिकाणी दूध विक्री करण्याची परवानगी देण्यात आली.

केवळ दूधच विकता येणार

अनेक विक्रेते हे बेकरी पदार्थ व दुधाची विक्री करतात. दुधाच्या आडून बेकरी पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही येत असल्याने महापालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे आता केवळ दूधच विक्री करता येईल, अशा स्पष्ट सूचना ‘गोकुळ’ प्रशासनाने दिल्या आहेत.

दूध विक्रीत घट कायम

लॉकडाऊनमुळे चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स बंद असल्याने मुळात दुधाची मागणी कमी झाली आहे. त्यात दूध विक्रीबाबत महापालिकेने घेतलेल्या धोरणाचा परिणाम विक्रीवर झाला आहे. त्यामुळे एकट्या गोकुळच्या कोल्हापूर शहरातील दूध विक्रीत १२ हजार लिटरची घट दिसत आहे.

Web Title: Milk can be sold in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.