साहित्य जागरातील मैलाचा दगड ‘दमसा’

By Admin | Updated: September 5, 2016 00:29 IST2016-09-05T00:29:20+5:302016-09-05T00:29:20+5:30

लेखकांना व्यासपीठ : वाचनसंस्कृती समृद्ध करण्यात भूमिका; सत्तावीस यशस्वी साहित्य संमेलने

Milestone in the field of 'Damsa' | साहित्य जागरातील मैलाचा दगड ‘दमसा’

साहित्य जागरातील मैलाचा दगड ‘दमसा’

संतोष तोडकर ल्ल कोल्हापूर
साहित्यविषयक नव्या प्रेरणांना व्यासपीठ मिळवून देण्यासह तीन दशकांपासून साहित्यविषयक जागर घरोघरी पोहोचविण्यात ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा’ (दमसा) मैलाचा दगड ठरली आहे. आजवर सत्तावीस यशस्वी साहित्य संमेलनांसह वाचनसंस्कृती समृद्ध करण्यातही संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ ही एकमेव संस्था शिखरावर होती. साहित्यव्यवहार पुणे, मुंबई, नागपूर शहरांपर्यंतच मर्यादित होता. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, सीमाभाग, कारावारपर्यंतचा मराठी मुलुख मुख्य साहित्य प्रवाहापासून वंचित होता. या प्रदेशातील नव्या पिढीला प्रेरणा देणं, त्यांना समजून घेणं व व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा. चंद्रकुमार नलगे, शंकर खंडू पाटील, देवदत्त पाटील, कृ. गो. सूर्यवंशी, आदी साहित्यिकांनी पुढाकार घेतला. त्यांना श्रीधर कुदळे, प्रा. डी. यू. पवार, प्रा. तुकाराम पाटील, अशोक भोईटे, प्रा. वि. द. कदम, प्राचार्य बी. बी. देशमुख, प्रा. विजय निंबाळकर, मधुकर वेदांते, प्रा. भैरव कुंभार, पी. सी. पाटील यांची साथ मिळाली आणि या प्रयत्नांतून दि. १४ मार्च १९८२ रोजी ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे’ची स्थापना करण्यात आली.
एका साहित्य संस्थेचे उद्घाटन एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नव्हती. प्रस्थापित साहित्यवर्तुळाचा दबाव व बंधने झुगारून साहित्याच्या केंद्राबाहेरील लोकांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून या घटनेला विशेष महत्त्व होते. याच वर्षी मे महिन्यात दि. २५ रोजी पहिले साहित्य संमेलन पार पडले. तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थान ग. ल. ठोकळ यांनी भूषविले. सध्या संस्थेची सभासदसंख्या पाचशेहून जास्त आहे.
गेल्या ३३ वर्षांच्या संस्थेच्या वाटचालीमुळे दक्षिण महाराष्ट्रात साहित्यविषयक जाण निर्माण झाली. वाचन चळवळ उभी राहिली. मुक्तचिंतनाला वाव मिळाला. वाचकांची अभिरुची समृद्ध होत राहिली. गेल्या काही वर्षांपासून नव्या पिढीतून नवसाहित्याची निर्मिती व्हावी, जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या नव्या समस्या, तंत्रज्ञानाच्या युगातील तरुणाईचे भावविश्व साहित्यातून प्रतिबिंबित व्हावे, यासाठी साहित्यसभा जाणीवपूर्वक शालेय विद्यार्थी, तरुण-तरुणींसाठी कार्यशाळा, शिबिरे, घेऊन मुलांना लिहिते-बोलते करीत आहे, त्यांचे संग्रह प्रकाशित करीत आहे.
मराठी साहित्य परिषदेसारखे साहित्य प्रक्रिया, साहित्यनिर्मिती व आस्वाद या घटकांत संमेलने, परिसंवाद, साहित्यपत्रिकाद्वारे ‘दमसा’ मराठी साहित्य मंडळाला पूरक असे कार्य करीत आहे. ३३ वर्षांत साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून प्रा. गं. बा. सरदार, शिवाजी सावंत, माधव गडकरी, शंकरराव खरात, हेतू भारद्वाज, शंकर पाटील, अनंत दीक्षित, रा. रं. बोराडे, मधु मंगेश कर्णिक, यशवंत मनोहर, रमाकांत रथ, गो. पु. देशपांडे, अशोक वाजपेयी या दिग्गजांनी उपस्थिती लावली; तर या संमेलनाचे अध्यक्षस्थान रणजित देसाई, पी. सावळाराम, आनंद यादव, वसंत बापट, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रमोद कोपर्डे, ना. सं. इनामदार, डॉ. गंगाधर पानतावणे, फ. मुं. शिंदे, प्रा. म. द. हातकणंगलेकर, बाबा कदम, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, प्रा. वसंत केशव पाटील, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. आ. ह. साळुंखे, द. ता. भोसले, ज्ञानेश्वर मुळे अशा विचारवंतांनी भूषविले.
राजाराम महाविद्यालयात सभेतर्फे भरविलेले ‘चित्र-शिल्प-काव्य’ अशा कलांचा संगम असलेले २७वे साहित्य संमेलन हे आशयदृष्ट्या श्रीमंत होते. साहित्य आणि विविध कलांच्या समन्वयातून वैचारिक जागर मांडून, नव्या पिढीशी जोडून घेण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले.
महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि साहित्यिकांनी त्यांच्याशी साधलेला संवाद हे या संमेलनाचे वैशिष्ट्य. संस्थेने साहित्यव्यवहार वाचकांपर्यंत पोहोचविणारी ‘दमदार दमसा’ अशी ओळख निर्माण केली आहे.
नवलेखकांची शाळा
‘दमसा’तर्फे ग्रामीण भागातील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे व साहित्यसंपदेत भर घालणारे लेखक घडावेत, या प्रेरणेतून ‘दमसा’कडे नवलेखक घडविण्याची कार्यशाळा म्हणून पाहिले जाते. यासह साहित्यिक मेळावे, कथालेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, काव्यसंमेलने, कृतिसत्रे, चर्चासत्रे, ग्रंथप्रकाशन, परिसंवाद, मुलाखती, राज्य पुरस्कारप्राप्त लेखकांचा सत्कार, विविध ग्रंथांना प्रोत्साहनपर पुरस्कार असे उपक्रम राबविण्यात येतात.
‘दमसा’चे प्रकाशित साहित्य
तेजोदीप ( प्रा. चंद्रकुमार नलगे), चंद्रचेतना, काहीच नष्ट होत नाही (विजय चोरमारे), प्रकाशवाटेवरच्या कविता, वर्तमान पिढीचे संदर्भ (प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार), किलबिल गोष्टी, शाळकरी मुलांच्या कविता (नामदेव माळी)
‘दमसा’चे पुरस्कार
‘दमसा’तर्फे विविध पुरस्कार दिले जातात. ‘कादंबरी’साठी देवदत्त पाटील, ‘कथासंग्रहा’साठी शंकर खंडू पाटील, ‘संशोधना’साठी अण्णा भाऊ साठे, ‘कवितासंग्रहा’साठी शैला सायनाकर, ‘संकीर्ण’साठी कृ. गो. सूर्यवंशी, ‘प्रथम प्रकाशना’साठी चैतन्य माने पुरस्कार यांचा समावेश होतो. बालवाङ्मय व विशेष पुरस्कारही दिले जातात.
साहित्य सभेतर्फे येत्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. ग्रामीण शब्दकोश, साहित्यिकांची साहित्यसूची, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात साहित्याचे महत्त्व, मराठी भाषेचे उपयोजन, तसेच सृजनावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.
- गोविंद पाटील, कार्यवाह, दमसा

ज्या भूमिकेतून साहित्य सभेची स्थापना केली, तो हेतू सफल झाल्याने समाधान वाटते आहे. नव्या पिढीकडे असलेली साहित्यमूल्ये जोपासण्याचे व त्यास नेमकी दिशा देण्याचे काम साहित्य सभा करते आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
-प्रा. चंद्रकुमार नलगे,
ज्येष्ठ साहित्यिक
 

Web Title: Milestone in the field of 'Damsa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.