स्थलांतरणाच्या सूचना
By Admin | Updated: August 3, 2014 00:58 IST2014-08-03T00:58:18+5:302014-08-03T00:58:18+5:30
चिपळूण तालुका : माळीणनंतर डोंगरकडेच्या गावांबाबत प्रशासन दक्ष

स्थलांतरणाच्या सूचना
चिपळूण : पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडलेल्या दुर्घटनेनंतर डोंगर पायथ्यालगत असलेल्या गावांचा सर्व्हे सुरु करण्यात आला असून यापूर्वीच तालुक्यातील १९ गावातील ग्रामस्थांना संभाव्य धोका लक्षात घेवून सूचना देण्यात आल्या असल्याचे तहसीलदार वृषाली पाटील यांनी सांगितले.
माळीण गावच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर मुनष्यहानी झाली. त्यामुळे राज्यभर डोेंगरालगत असलेल्या गावांचा सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक तहसिलदार कार्यालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार तहसिलदार कार्यालयामार्फत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यात यापूर्वीच शिवणेबुद्रूक आणि वडदहसोळ गावात भूस्खलनाचा मोठा धोका पचवावा लागला आहे. शिवणेबुद्रूक येथे तर दरड कोसळून काही लोक गाडले गेले होते. मात्र या जुन्या घटनांतूनही बोध घेण्यात आलेला नाही.
आता माळीण गावी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने पावले उचलली आहेत. धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला आहे.
चिपळूण तालुक्यात १९ गावात धोकादायक स्थिती असल्याने किंवा यापूर्वी तेथे दुर्घटना घडली असल्याने येथील ग्रामस्थांनी स्थलांतर करावे, अशा आशयाच्या सूचना आपण यापूर्वीच दिल्या आहेत. पुन्हा या गावातील लोकांना सतर्क करण्यात येणार आहे.
सध्या पाऊस बेताचा असल्याने धोकादायक स्थिती नाही तरीही महसूल यंत्रणा सतर्क आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भूस्खलांचा धोका असलेल्या गावांचा सर्व्हे सुरु आहे असेही तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)