वेदगंगेच्या काठच्या सातशेहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:48+5:302021-07-24T04:16:48+5:30

: गेले तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीने कागल तालुक्यातील दुधगंगा, वेदगंगा नद्यांना ...

Migration of more than seven hundred families along the banks of the Vedganga | वेदगंगेच्या काठच्या सातशेहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

वेदगंगेच्या काठच्या सातशेहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

: गेले तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीने कागल तालुक्यातील दुधगंगा, वेदगंगा नद्यांना महापूर आल्याने या नदी काठच्या ३३ गावातील सातशेहून अधिक कुटुबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. चार बंधारे, दोन मोठे पूल, १६ ठिकाणी ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. कागलजवळील आय.बी.पी. पेट्रोल पंपासमोर महामार्गावर पाणी आले आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कुटुंब पशुधनासह स्वतःहून सुरक्षित जागी स्थलांतर करीत आहेत.

कसबा सांगाव, मौजे सांगाव , सुळकुड, लिंगणूर दुमाला, करनूर ,वंदुर, सिद्धनेर्ली, आणुर, म्हाकवे, बस्तवडे, नानीबाई चिखली, बाणगे, निढोरी, मुरगुड आदी गावात पुराचे पाणी शिरले आहे. घरांच्या पडझडीही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. पूरग्रस्त म्हणून घोषित झालेल्या गावातूनच नागरिकांचे स्थलांतर करावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून आलेल्या दोन रेस्क्यू पथकांना कागल आणि मुरगुड येथे तैनात केले आहे. एक पाणबोटही तालुक्यासाठी आली आहे.

चौकट

: कागल शहरातील उपनगरांचा संपर्क तुटला

कागलमधील श्रमिक वसाहत, संकपाळ मळा, पिष्टे मळा या भागाकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर पाणी आले आहे. जयसिंगराव पार्क कडून जाणाऱ्या मार्गावर जयसिंगराव तलावाचे सांडवे सुटून आलेले पाणी रस्त्यावर आले आहे. तर स्मशानभूमीकडील मार्गावर नागोबा ओढ्यावरील पुलावर पाणी आले आहे.

चौकट : स्थानिक आपत्ती निवारण पथक

करनूर येथील सह्याद्री रेस्क्यू फोर्समधील युवकांनी येथील दुधगंगा नदीवर सुरक्षेची प्रात्यक्षिके केली. गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, तहसीलदार शिल्पा ठोकडे यावेळी उपस्थित होते. या पथकाला जे जे साहित्य लागेल ते देणार असल्याचे नवीद मुश्रीफ यांनी सांगितले.

फोटो : 1) कागल येथील श्रमिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जयसिंगराव तलावाचे पाणी असे वाहत आहे.

2) करनुर येथील पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.

Web Title: Migration of more than seven hundred families along the banks of the Vedganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.