ग्रामीण भागातही नळांना बसणार मीटर

By Admin | Updated: November 28, 2014 23:45 IST2014-11-28T23:05:49+5:302014-11-28T23:45:44+5:30

शासनाच्या निधीतूनच मीटर मिळणार

Meters in the rural areas | ग्रामीण भागातही नळांना बसणार मीटर

ग्रामीण भागातही नळांना बसणार मीटर

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्याला वरदान ठरलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेनंतर आता तालुक्यातील नृसिंहवाडी, शिरढोण व टाकवडे या गावांमध्ये नळांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या तीन गावांतील नळ पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प शासनाच्या निधीतूनच राबविला जाणार आहे.
नागरी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय पेयजल योजना प्रामुख्याने ग्रामीण भागात पुढे आली आहे. शुद्धिकरणासह पाणी नागरिकांना मिळावे, हा उदात्त हेतू पुढे घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी, शिवाय गावाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने शासनाने आणखी एक विकासात्मक पाऊल पुढे टाकले आहे. नळांना मीटर बसविण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे या गावांत प्रथम नळांना मीटर बसविण्याचा ग्रामीण भागातील एकमेव प्रकल्प राबविला जाणार आहे. नृसिंहवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे, तर शिरढोण-टाकवडे येथेही पेयजल योजनेचे काम सुरू आहे. या तीनही गावांत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नळांना मीटर बसविण्यात येणार आहे. शासनानेच याबाबत धोरण निश्चित केले आहे. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. जयसिंगपूर नगरपालिकेनंतर शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नळांना मीटर बसविण्याचा पहिलाच प्रकल्प नावारूपास येणार आहे.

शासनाची संकल्पना
शासनाच्या पेयजल योजनेमुळे शुद्ध व मुबलक पाणी नागरिकांना मिळणार आहे. योजना मंजूर करीत असतानाच नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे या गावांतील नळांना मीटर बसविण्याच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नळ ग्राहक तेथे मीटर अशी संकल्पना निश्चित राबविली जाणार असून, यामुळे पाण्याचा योग्य वापर नागरिकांना करणे गरजेचे बनणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Meters in the rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.