व्हाॅट्सॲपवर मेसेज केला, तरुणीवर गोळीबार झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:33+5:302021-09-18T04:27:33+5:30

कळंबा : कळंबा तलाव परिसरात शुक्रवारी सकाळी तरुणाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. या गोळीबारात तरुणी चार छर्रे लागून जखमी ...

Messaged on WhatsApp, the young woman was shot | व्हाॅट्सॲपवर मेसेज केला, तरुणीवर गोळीबार झाला

व्हाॅट्सॲपवर मेसेज केला, तरुणीवर गोळीबार झाला

Next

कळंबा : कळंबा तलाव परिसरात शुक्रवारी सकाळी तरुणाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. या गोळीबारात तरुणी चार छर्रे लागून जखमी झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. यात तरुणीची आईही जखमी झाली आहे. संबंधित तरुणी व्हाॅट्सॲपवर कसले तरी मेसेज करते, या रागातून हा गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने संशयित ऋषिकेश बाबूराव कोळी (वय ३५ ) याला सायंकाळी अटक केली. त्याच्यासह पत्नी अर्चना ऋषिकेश कोळी (वय ३२, रा. दोघे मगदूम काॅलनी, पाचगाव) हिच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी जखमी तरुणीच्या आईने फिर्याद दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचगाव येथील मगदूम काॅलनीत संशयित ऋषिकेश कोळी हा पत्नी अर्चना व आईसोबत राहतो. तो विवाहित असून, उपनगरात राहणाऱ्या तरुणीसोबत त्याची ओळख होती. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता संबंधित तरुणीने संशयित ऋषिकेशच्या मोबाइलवर कसला तरी मेसेज पाठविला. हा मेसेज त्याच्या पत्नीने वाचला. त्यांच्यात यावरून वादावादी झाली. त्यानंतर संबंधित तरुणीला ऋषिकेशच्या पत्नीने फोन करून शिवीगाळ केली. तुझ्या घरी येऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतो, असेही बोलली. संबंधित तरुणीच्या आईने घरी नको, कळंबा तलावाजवळील सांस्कृतिक कार्यालयाजवळ या, तेथे चर्चा करू, असे सांगितले. तत्काळ संशयित ऋषिकेश व त्याची पत्नी चारचाकी घेऊन तेथे पोहोचले. काही वेळाने संबंधित तरुणी व तिची आईही तेथे आली. तरुणीला पाहताच पती-पत्नी दोघेही चिडले आणि त्यांनी तिच्याकडे धाव घेत शिवीगाळ करीत मारहाण केली. तरुणीच्या आईने त्या दोघांना ढकलून दिले. त्यामुळे अधिकच चिडलेल्या कोळी दाम्पत्याने चारचाकीत ठेवलेली छर्र्याची बंदुक आणत त्यातून गोळीबार केला. या गोळीबारात संबंधित तरुणीच्या नाकावर, भुवयांवर आणि पोटात छर्रे घुसल्याने ती जमिनीवर कोसळली. यातील एक छर्रा तिच्या आईच्या छातीत घुसला. त्यामुळे दोघीही जखमी झाल्या. या घटनेनंतर गोंधळ व आरडाओरडा एकूण परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे संशयित कोळी दाम्पत्याने तेथून पळ काढला. नागरिकांनी या दोघींना खासगी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप काेळेकर हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यानंतर तात्काळ अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उपअधीक्षक आर.आर.पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

संशयितास घेतले कात्यायानीतून ताब्यात

संबधित तरुणी घडल्या प्रकाराबद्दल तक्रार देण्यास तयार नव्हती, यात बराच काळ गेला. तब्बल चार तासानंतर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित ऋषिकेशला कात्यायानी परिसरात मोबाईल लोकेशनवरून ताब्यात घेऊन करवीर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या ताब्यातील चारचाकीही ताब्यात घेतली.

फोटो : १७०९२०२१-कोल- कळंबा

आेळी : कळंबा (ता. करवीर) येथील तलाव परिसरात शुक्रवारी सकाळी युवतीवर गोळीबार झालेल्या जागेची पोलिसांनी पाहणी केली.

फोटो : १७०९२०२१-कोल- ऋषिकेश कोळी (संशयित)

Web Title: Messaged on WhatsApp, the young woman was shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.