आनंददायी शिक्षण देणारे
By Admin | Updated: July 7, 2015 23:58 IST2015-07-07T23:58:20+5:302015-07-07T23:58:20+5:30
वसगडेतील कुमार मंदिर--गुणवंत शाळा

आनंददायी शिक्षण देणारे
मुलांना उपक्रमशील, दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण देण्याचे काम वसगडे (ता. करवीर) येथील कुमार मंदिर करत आहे. लोकशाही निवडणूक तंत्र, माहितीचे ज्ञान, तेही प्रात्यक्षिकांसह मिळावे व मिनी मंत्रिमंडळ तयार होऊन शाळेच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग, नेतृत्व देऊन करता यावे म्हणून या शाळेत निवडणुकीचा उपक्रम राबविला जातो.
मतपत्रिका छापून मुख्यमंत्री, शिस्त व क्रीडा, उपमुख्यमंत्री व आरोग्य, सहल, सांस्कृतिक, पर्यावरण, सचिव अशी खाती व त्यासाठी उमेदवारी अर्ज मागविले जातात. निवडणुकीची सर्व प्रक्रिया मतपत्रिका, शिक्का, मतदान बूथ, केंद्र अधिकारी, पोलिंग एजंट नेमून मतदान व मतमोजणी करून मंत्री निवडतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी कार्यक्रमासह विद्यार्थी ही कार्यपद्धती अवलंबतात.
१२३ विद्यार्थी संख्या असलेली पहिली ते चौथीपर्यंतची मुलांची ही शाळा आहे. शिक्षक संख्या चार आहे. मुख्याध्यापक पद नेमण्यास शाळेची पटसंख्या पात्र नसूनही चार शिक्षकांचे टीमवर्क आणि कामाच्या पद्धतीचे नियोजन अगदी सुसूत्र आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नम्रता सावंत यांची रोज शाळेस भेट हा जणू त्यांचा दिनक्रमाचा भाग बनला आहे. जमीन सपाटीकरण, क्रीडांगण हे लोकसहभागातून केले आहे. पालकांचा पुढाकार व आर्थिक साहाय्यातून बोलके व्हरांडे, डिजिटल वर्ग, ज्ञानपताका हे तर ज्ञानदानाचे व नजरेसमोर राहून सराव करण्याचे साधन मुलांसमोर सतत आहे.
इंग्रजी, मराठी अक्षर, शब्द व वाक्य ओळखणे, शब्द तयार करणे व वाक्य सांगणे यासाठी ‘अमृतकुंभ’ उपक्रम राबविला जातो. आदल्या दिवशी कागदी बॉक्समध्ये विद्यार्थी प्रश्न टाकतात व दुसऱ्या दिवशी परिपाठावेळी उत्तर देणाऱ्यांची नोंद ठेवली जाते. या प्रश्नमंजूषा उपक्रमात मुले खूप रमतात. आनंददायी पद्धतीने हे शिक्षण दिले जाते.
शाळेतील ५० टक्क्यांहून अधिक मुले अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमातीतील आहेत. इतर मागासवर्गीयांची संख्या ३१ आहे. शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेली, या प्रवाहापासून वंचित राहिलेल्या मुलांना उपक्रमशील व दर्जेदार शिक्षण देण्याची शिक्षकांमधील तळमळ व कळकळ खूपच जाणवते. ही मुले आत्मविश्वासाने ई-लर्निंग, संगणक शिकत आहेत. विद्यार्थ्यांची हजेरी वेगळेपण दाखविणारी आहे. उपस्थित मुले ‘यस’ न म्हणता कॅट-मॅट-बॅट अशासारखे शब्द उच्चारतात. दिवसातून तेवढे शब्द कानावर पडतात. श्री संत सेवा नाभिक संघटनेच्या सहकार्याने शाळेत मुलांचे केस कापण्याचा कार्यक्रम घेतला गेला. यावेळी सरपंच, पंचायत समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. नाभिक मंडळींकडून ही विनामूल्य सेवा दिली. हा उपक्रम त्या व्यवसायाचे मूल्य व प्रतिष्ठा वाढविणारा आहे.
भारतीय संस्कृतीची जाणीव करून देऊन, महत्त्व सांगून त्याबद्दल जवळीक निर्माण करणारे रक्षाबंधन, मातृदिन, महिलादिन, कृष्णाष्टमी, गणेशपूजन, नवरात्रात स्त्रीशक्तीची पूजा, अशासारखे कार्यक्रम घेतले जातात. ‘हात धुवा दिवस’, ‘शिवी बंद प्रतिज्ञा’ वगैरेंमुळे मुले स्वच्छता, मानसिक पर्यावरण शिकत आहेत. जागतिक पर्यावरण दिन, वृक्षारोपण संवर्धन, महान नेत्यांची जयंती साजरी केली जाते. जून ते मार्च या महिन्यात जे कार्यक्रम घ्यायचे त्याचा लिखित नियोजन तक्ता काटेकोर व सर्वसमावेशक असतो. जबाबदारी घेणारे लोकप्रतिनिधी, सहकार्य देणारी शाळा व्यवस्थापन समिती, गुणवत्ता विकासासाठी धडपडणारे शिक्षक या शाळेमध्ये आहेत.
- डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये
मुलांच्या भावनिक विकासासाठी अंध कलाकारांचे कार्यक्रम, व्याख्यान, गतिमंद शाळेला भेट, आजारी मुलाच्या घरी जाऊन चौकशी, असे सहसंवेदना अनुभव देणारे उपक्रम घेतले जातात.
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात अवगत केलेल्या मूलभूत क्षमतांचा व्यवहारात उपयोग करणे, आनंददायी मनोरंजक वातावरणात रमणे, श्रम, प्रतिष्ठा रुजविण्याचा हेतू साध्य करण्यास मदत होते.
आठवडी बाजार दुकान व यात्रेनिमित्त स्टॉल लावण्यातून ज्ञानाचा बाह्यजगाशी मेळ घालणे, वगैरे बाबींचे लाभ होतात.
शिक्षक क्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन विचारपूर्वक करीत आहेत. सुतार, लोहार, कुंभार, मूर्ती बनविणे, हार-बुके तयार करणे, पिठाची, कांडपाची गिरणी, वगैरेसारख्या व्यावसायिक ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेतात.
मुलांमध्ये व्यवसाय कौशल्याची आवड, कुतूहल निर्माण करण्यासाठी शिक्षक यासारखे उपक्रम राबवितात.
‘बचत बँक’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. बचतीची सवय लागते व हिशेब ठेवण्यात पारंगतता येते. जमा रक्कम, काढलेले पैसे, सही, फॉर्म भरणे यासारख्या तपशिलाचे काम विद्यार्थी करतात.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सातत्य राहावे म्हणून ‘उपक्रम स्टार’ घेतला जातो. सर्वाधिक उपस्थितीसाठी हिरवा, क्रमवारीने दुसरा असल्यास पिवळा, तिसरा असल्यास निळा, कनिष्ठ असल्यास लाल स्टार दिला जातो.