मर्कटलीलांनी ट्रॅक्टरचालक हैराण

By Admin | Updated: November 30, 2015 01:15 IST2015-11-29T21:19:19+5:302015-11-30T01:15:57+5:30

बंदोबस्ताची मागणी : पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील प्रकार

Mercantile tractor driver Haren | मर्कटलीलांनी ट्रॅक्टरचालक हैराण

मर्कटलीलांनी ट्रॅक्टरचालक हैराण

पोर्ले तर्फ ठाणे : वेळ कोणतीही असू दे, ट्रॅक्टरचालक दिसला की त्याच्या अंगाखांद्यावर जाऊन बसायचे आणि जोरात श्रीमुखात लावायची (थोबाडायचे), नाहीतर त्याचा पाठीमागून चावा घेऊन जखमी करायचे. सुटकेसाठी चालकाचा आरडाओरडा ऐकून दोघे, चौघे जमले की उंच ठिकाणापर्यंत पोहोचायचे आणि वरून लोकांना चिडवायचे, अशाप्रकारे वानरांची दहशत पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील ग्रामस्थ व ट्रॅक्टरचालकांना अनुभवण्यास मिळत आहे. ट्रॅक्टरचालकांच्या मनात वानरांच्या आक्रमकतेची भीती निर्माण झाली आहे. गावाच्या कानाकोपऱ्यात उच्छाद मांडणाऱ्या या वानरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
महिनाभरापासून ४० वानरांच्या कळपाचा गावात वावर आहे. यातील एक वानर ‘नामा’निराळ्या ट्रॅक्टरमालकाच्या ट्रॅक्टरच्या बॉनेटवर बसले होते. पाठीमागून त्याने वानराच्या पाठीत काठीचा रट्टा घातला. जीव वाचविण्याच्या नादात वानर घराच्या कौलांवर जाऊन बसले. त्या ‘नामा’च्या सर्व हालचालींवर वानरांनी बारीक लक्ष दिल्याने ट्रॅक्टर चालविणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘नामा’ समजून हल्ला करू लागले. गावातून ट्रॅक्टर चालविताना चालक दिसला की त्याला थोबाडीत मारायचे अथवा त्याचा चावा घेऊ लागले. दीपक नीळकंठ या चालकाला त्याने दोनवेळा चावून जखमी केले, तर आतापर्यंत २० ते २५ चालकांना श्रीमुखाचा ‘प्रसाद’ त्या वानराकडून खावा लागला आहे.
ते कधी, कोठून येईल आणि हल्ला करेल याचा काही नेम नाही. गावातून ट्रॅक्टर चालविताना समोरील वाहनाला पास करायचे की घरावरून टेहळणी करणाऱ्या वानरांची नजर चुकवायची या विवंचनेत पोर्ले गावातील ट्रॅक्टरचालक सापडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या बेधडक हल्ला चढविणाऱ्या वानरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

गावात वानरांचे प्रमाण वाढले असून, वन विभागाकडे त्यांना पकडणारे तज्ज्ञ कर्मचारी नाहीत. वानरांना पकडणारी मंडळी मिरजेत आहेत. त्यांना बोलावून त्यांचा खर्च संबंधित ग्रामपंचायतीकडे सोपविला जातो. पकडलेल्या वानरांना जंगलात सोडण्याचे काम केले जाते.
- प्रशांत तेंडुलकर, पन्हाळा तालुका परिक्षेत्र अधिकारी


वन्यप्राण्यांची देखभालीची जबाबदारी वनखात्याची असते. प्रत्येक गावागावांत वानरांचा उच्छाद सतत सुरू असतो. त्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडण्याची जबाबदारीसुद्धा वन विभागाचीच आहे. वन विभाग मिरजेतील तज्ज्ञ मंडळींकडे बोट करतात. म्हणजे ते पळवाट शोधत आहेत.
- दिनकर चौगुले, निसर्ग व सर्पमित्र, पोर्ले तर्फ ठाणे.

Web Title: Mercantile tractor driver Haren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.