संगणकाच्या अतिवापराने मानसिक आजार
By Admin | Updated: August 11, 2014 00:18 IST2014-08-10T23:46:27+5:302014-08-11T00:18:04+5:30
मानसी बोडस : इंटरनेटचे दुष्परिणाम टाळा; संगणकाचा गैरउपयोगच जास्त

संगणकाच्या अतिवापराने मानसिक आजार
कोल्हापूर : मानवाने संगणकाच्या मदतीने सर्व विश्व मुठीत घेतले; पण कल्पना करू शकत नाही इतके विश्वातील ज्ञान एका सेकंदात इंटरनेटवरून मिळते. संगणकामुळे वेळेची बचत होत असली, तरी
त्याच्या उपयोगापेक्षा गैरउपयोगच जास्त होत आहे. संगणकाच्या अतिवापराने अनेकजण शारीरिक व मानसिक आजाराला बळी पडू लागले आहेत. पालकांनी मुलांना वेळीच इंटरनेच्या दुष्परिणामापासून दूर ठेवावे, असे प्रतिपादन पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या मानसी बोडस यांनी केले.
सन्मित्र हौसिंग सोसायटीच्या सभागृहात पालक मंच संवेदना शिक्षण प्रसारक मंडळ व राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीच्यावतीने आयोजित ‘इंटरनेट किती दूर? किती जवळ?’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
बोडस म्हणाल्या, ‘दैनंदिन आणि कार्यालयीन कामात नेहमी उपयोगी पडणारा होतकरू मित्र म्हणजे संगणक. इंटरनेटमुळे वेळ, पैसा वाचतो. अचूक माहितीही ‘क्लिक’वर मिळते. त्यामुळेच पालक माझा मुलगा या तंत्रज्ञानाच्या विश्वात मागे राहू नये म्हणून त्याला कॉम्युटर, मोबाईल आणि इंटरनेट या सुविधा उपलब्ध करून देत आहेत, परंतु आपला
मुलगा त्याचा सदुपयोग करतो की दुरुपयोग हे पाहण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही. किंबहुना बऱ्याच पालकांना संगणकाचे ज्ञान मुलांपेक्षा कमी असल्याने आणि संगणकाचा तो दुरुपयोग कसा
करतो याची त्यांना कल्पनाही नाही.
या गोष्टी वेळीच ओळखल्या
पाहिजेत. बदल हा निसर्गाचा नियमच आहे; पण आगपेटीतील एका
काडीने अंधार नाहीसा होतो,
त्याच काडीद्वारे इमारतीलाही आग लावली जाते, हे विसरता कामा
नये.
विदुला स्वामी यांनी स्वागत केले. जय वडगावे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता माटे यांनी आभार मानले. यावेळी पालकमंच अध्यक्षा सुमेधा कुलकर्णी, प्रज्ञा हेर्लेकर, प्रसाद हेर्लेकर, प्राजक्ता कुलकर्णी, शुभांगी सोहनी, मंजिरी हर्डीकर, संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष एम. पी. कालगावकर, सचिव
श्रीकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)