‘मेनन’च्या कामगारांना वेतनवाढ
By Admin | Updated: December 4, 2014 00:45 IST2014-12-04T00:45:01+5:302014-12-04T00:45:01+5:30
चार हजार ७०० ची वाढ : साडेतीन वर्षांचा झाला करार

‘मेनन’च्या कामगारांना वेतनवाढ
कोल्हापूर : विक्रमनगर येथील मेनन अॅण्ड मेनन लिमिटेडमधील व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमध्ये साडेतीन वर्षांसाठीच्या वेतनवाढीचा करार झाला. या करारानुसार कामगारांना प्रत्येकी मासिक सरासरी ४ हजार ७०० इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे. मंदीची स्थिती असूनही वेतनवाढ झाल्याने कामगारांमध्ये उत्साह पसरला आहे.
या करारात उत्पादनाशी निगडित २ हजार ४५० इतकी रक्कम व्हेरिएबल पेमेंट म्हणून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त उत्पादनाशी निगडित फायदे सरासरी २ हजार ५० इतकी रक्कम बेसलाईन पेमेंट म्हणून निश्चित केली आहे. मूळ वेतनवाढीच्या व्यतिरिक्त अन्य भत्त्यांमध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. शांततेत आणि मुदतीपूर्व करार झाला आहे. करारात कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कामगाराची व त्यांच्या पत्नीची मेडिक्लेम पॉलिसी उतरविण्याची तरतूद केली आहे. कराराचे फायदे १ डिसेंबर २०१४ पासून पुढील साडेतीन वर्षांसाठी राहणार आहेत. करारावर मेनन अॅण्ड मेननचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विजय मेनन, कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्या स्वाक्षरी आहेत. कराराच्या प्रक्रियेत कामगार संघटनेनेकडून जॉनी देसाई, एस. एस. यादव, एस. एस. हेर्लेकर, टी. ए. माळी, बी. बी. यादव, व्ही. एस. परीट, तर व्यवस्थापनाकडून एचआरचे जनरल मॅनेजर उल्हास चंद्रात्रे, संजय बुरसे, विवेक हरिदास, शशिकांत हाळदकर, सुहास खडके आदी सहभागी झाले होते. करारावरील स्वाक्षरीवेळी रमेश सबनीस, अरविंद तुराखिया आदी उपस्थित होते.
करारानंतर कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून जल्लोष केला. (प्रतिनिधी)