कुरुंदवाड पालिका सभागृहाला बाळासाहेब ठाकरे यांचा विसर

By Admin | Updated: February 9, 2015 00:36 IST2015-02-09T00:12:32+5:302015-02-09T00:36:44+5:30

तैलचित्र लावण्याचा ठराव : अंमलबजावणीस दोन वर्षांची प्रतीक्षा

For the memorial of Kurundwad Municipal Council, Balasaheb Thakre | कुरुंदवाड पालिका सभागृहाला बाळासाहेब ठाकरे यांचा विसर

कुरुंदवाड पालिका सभागृहाला बाळासाहेब ठाकरे यांचा विसर

कुरुंदवाड : येथील नगरपालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव होऊन दोन वर्षे होत आली तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. पालिका सत्तेत शिवसेना असतानाही सभागृहालाच शिवसेनाप्रमुखांचा विसर पडल्याने शिवप्रेमींतून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसबरोबर शिवसेनाही आपले वर्चस्व टिकवून आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर एप्रिल २०१३च्या पालिकेच्या मासिक सभेत शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावण्याचा ठराव करण्यात आला. शिवसेनेचे पालिकेतील नगरसेवक वैभव उगळे यांनी हा ठराव मांडला होता. मात्र, ठराव होऊन दोन वर्षे होत आली तरी या ठरावाला प्रशासनाबरोबरच पालिका सदस्यांनीच वाटाण्याच्या अक्षता लावल्याने ठराव हा केवळ कागदावरच राहिला आहे.
सध्या पालिकेत राष्ट्रवादी व जनविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीतून पूर्वाश्रमीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास उगळे, तर जनविकास आघाडीतून शिवसेना जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष वैभव उगळे सत्तेत आहेत. वैभव उगळे सध्या उपनगराध्यक्ष असून, पालिका निर्णय प्रक्रियेतील वजनदार नगरसेवक मानले जातात. असे असतानाही शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र पालिका सभागृहात लावण्यास दिरंगाई का होत आहे? असा सवाल शिवसेना कार्यकर्त्यांबरोबरच शिवप्रेमींतूनही होत आहे.
राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही शासनाने अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेतला; मात्र येथील पालिका सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव होऊनही त्यालाही दोन वर्षे वाट पाहावी लागत आहे.

पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव झाला आहे. मात्र, या ठरावाबाबत संपूर्ण माहिती घेऊन त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल.
- अतुल पाटील, मुख्याधिकारी

Web Title: For the memorial of Kurundwad Municipal Council, Balasaheb Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.