सभासद ‘कुंभी बचाव’ला हद्दपार करतील

By Admin | Updated: December 22, 2015 00:51 IST2015-12-22T00:41:11+5:302015-12-22T00:51:26+5:30

चंद्रदीप नरके : शिरोली दुमाला येथील सभेत विरोधकांवर टीका

Members will expel 'Kumbh Rescue' | सभासद ‘कुंभी बचाव’ला हद्दपार करतील

सभासद ‘कुंभी बचाव’ला हद्दपार करतील

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत नरके पॅनेलने कारखान्यात काटकसरीचा कारभार करत विविध प्रकल्प उभारून उत्पन्नात वाढ केली. सत्तेच्या काळात सभासदांच्या हिताचा पारदर्शक कारभार केला, पण सामाजिक संघटनेचा आव आणून सत्तेसाठी खोटे आरोप करणाऱ्या कुंभी बचाव मंचला सभासद हद्दपार करून नरके पॅनेलला विक्रमी मतांनी विजयी करतील, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला.
कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ शिरोली दुमाला (ता. करवीर) आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सखाराम पाटील होते. नरके पॅनेलने केलेला आदर्श कारभार पाहून अनेकांनी निवडणुकीत माघार घेऊन सहकार्याची भूमिका घेतली, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून कुंभी बचाव मंचने निवडणूक लावली आहे. त्यामुळे कारखान्याला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. स्वर्गीय डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कारभार केल्याने सभासदांचे पाठबळ कायम आहे. आम्ही सत्तेच्या काळात सभासदांच्या हिताचे भरीव कार्य केल्याने केवळ पोकळ आश्वासने देणाऱ्या विरोधकांना सभासदच मोठ्या मताधिक्याने पराभूत करतील, असेही आमदार नरके यांनी सांगितले.
कमी वेळेत, कमी खर्चात सहवीज प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ झाली, पण प्रकल्प उभा करताना कुंभी बचावच्या नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रकल्प पूर्ण केला. निवडणूक बिनविरोध करू म्हणणारे बचाव मंच आता निवडणूक कशासाठी लढवत आहे. कारखान्यावरील कर्ज हे कर्ज नसून भांडवली गुंतवणूक आहे. कोणत्याही संस्थेचा विकास कर्ज घेतल्याशिवाय होत नाही. आम्ही आत्मविश्वासाने कर्ज घेतले, भांडवल उभा केले, त्यातून उत्पन्न मिळवून वेळेत कर्जाचे हप्ते परत केले. साखर, उपपदार्थ शिल्लक आहे. शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देत असल्याने विरोधकांचे आरोप तथ्यहीन आहेत. राजकारणातील आरोप-प्रत्यारोप समजू शकतो, एवढे करून बचाव मंच थांबला नाही तर आमच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा बेगडी विरोधकांपासून कारखान्याला खरा धोका असून त्यांना वेळीच रोखून सभासदांनी नरके पॅनेलला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार नरके यांनी केले. आनंदराव पाटील, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, भगवान रामा पाटील, सदाशिव खाडे उपस्थित होते. आरळे, चाफोडी, सावरवाडी, गणेशवाडी परिसरात प्रचारदौरा केला.

Web Title: Members will expel 'Kumbh Rescue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.