‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीपासून अलिप्त
By Admin | Updated: December 22, 2015 00:50 IST2015-12-22T00:40:31+5:302015-12-22T00:50:43+5:30
उमेदवारांकडून पाठलाग : राजू शेट्टी यांच्या आदेशानुसारच निर्णय

‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीपासून अलिप्त
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतील चुरशीमुळे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य सहलीवर गेले आहेत. मात्र, अजून तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाच सदस्य आणि एक सभापती सहल आणि विविध आमिषांपासून दूर राहत कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत. सोमवारी ‘स्वाभिमानी’चे सहाजण येथील जिल्हा परिषदेत येऊन नियमित कामकाज पाहिले.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री सतेज पाटील आणि विद्यमान आमदार महादेवराव महाडिक विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक मतदाराला ‘सोन्याचा भाव’ आला आहे. मतदारांच्या हाता-पाया पडण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. अनेक मतदार ‘टोकन’ घेऊनच सहलीवर गेल्याची चर्चा आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंब्याचा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार ‘स्वाभिमानी’च्या सदस्यांच्या संपर्कात आहेत. सहलीची आॅफर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून ‘स्वाभिमानी’चे सदस्यही जम्मू-काश्मीर, केरळ येथे सहलीला गेल्याची चर्चा जोरात सुरू होती. जाहीरपणे भूमिका न घेता सहलीवर कसे गेले, अशीही विचारणा होत होती.
‘स्वाभिमानी’चे जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे, नीता परीट, अनिल मादनाईक, सुनंदा दानोळे, सीमा पाटील, सभापती शीला पाटील सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीला गेले आहेत या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, पाठींब्यासाठी दोन्ही उमेदवार पाठलाग करीत या सहा सदस्यांशी थेट संपर्क साधून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाला पाठिंबा देणार याचा निर्णय अद्याप झालेला नसून तो खासदार राजू शेट्टी घेणार आहेत. ‘स्वाभिमानी’चे कोणीही सहलीवर गेलेले नसून ‘स्वाभिमाना’ने ते आपल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. शेट्टी दिल्लीहून आल्यानंतर निर्णय होईल. मतदानादिवशी स्वतंत्रपणे येवून ते मतदानाचा हक्क बजावतील.
- भगवान काटे, जिल्हा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना