बिद्रीच्या सभासद भागभांडवल वाढीस सभासदांनी वार्षिक सभेत विरोध करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:01+5:302021-09-26T04:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासद भागाची किंमत दहा हजारांहून १५ हजार करण्यास सभासदांनी ...

बिद्रीच्या सभासद भागभांडवल वाढीस सभासदांनी वार्षिक सभेत विरोध करावा
लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासद भागाची किंमत दहा हजारांहून १५ हजार करण्यास सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोध करावा, असे आवाहन बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले. कारखान्याच्या ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सभेच्या अनुषंगाने विरोधी आघाडीच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची शुक्रवारी राधानगरीत बैठक झाली.
सूर्यवंशी म्हणाले, कारखाना स्थापनेवेळी शेअर्स रक्कम १००० रुपये होती. त्यावेळी साखर ३ रुपये किलो मिळत होती. आज शेअर्स रक्कम १० हजार रुपये व साखर १० रु. व २० रु. किलो मिळते. वाढत्या शेअर्स रकमेच्या तुलनेत सभासदांना कोणताही फायदा होत नाही.
कसबा वाळवेचे माजी सरपंच अशोक फराकटे म्हणाले, कारखान्याचा सहवीज प्रकल्प उभारणीसाठी शेअर्स ५००० रु.वरून १०००० रु. केली. त्यावेळी अध्यक्ष यांनी सहजीव प्रकल्पामधून होणाऱ्या नफ्यातून एफआरपी रक्कम सोडून उसाला प्रतिटन २०० ते ३०० रु. जादा दर उसाला देण्याचे आश्वासन दिले होते. कारखान्याला सहवीज प्रकल्पामधून वार्षिक ४० ते ४५ कोटी नफा होतो असे सांगितले जाते. तरीही वाढीव दर दिला जात नाही. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पाच्या नावाखाली भागाची रक्कम वाढवण्यास विरोध राहील.
यावेळी बाजार समितीचे शासन नियुक्त संचालक विश्वनाथ पाटील, सुभाष चौगले, संजय गांधी समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, शामराव भावके, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, विजय बलुगडे, माजी सरपंच अशोक वारके, अरविंद पाटील, सुभाष पाटील-मालवेकर, विलास पाटील, राजेंद्र चौगले, ए.बी. पाटील, राजू मगदूम, डी.पी. पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.