कृती समितीचा मंगळवारी मेळावा
By Admin | Updated: December 26, 2014 00:03 IST2014-12-25T23:25:50+5:302014-12-26T00:03:46+5:30
सर्व आमदार राहणार उपस्थित : टोलमुक्तीबाबत घडामोडींची देणार माहिती

कृती समितीचा मंगळवारी मेळावा
कोल्हापूर : शहरातील टोलमुक्तीबाबत राज्य शासनाकडून काही सकारात्मक हालचाली होत आहेत. मात्र, शासनस्तरावर सुरू असलेल्या या घडामोडींची माहिती जाहीर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि. ३०) मेळाव्याचे आयोजन केले आहे.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व दहा आमदार या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी दिली.
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात ‘आयआरबी’ कंपनीने केलेल्या ४९.४९ किलोमीटर रस्त्यांच्या खर्चाचे पुन्हा एकदा मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. समितीची पहिली बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. तत्पूर्वी, टोलबाबत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींची माहिती जनतेला व्हावी, तसेच शासन टोलमुक्त करण्यात कमी पडल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्याचे ठिकाण व वेळ नंतर जाहीर करण्यात येईल, असे साळोखे यांनी स्पष्ट केले.