महसूलमधील बनावट आदेशप्रकरणी आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:16+5:302021-07-19T04:16:16+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल विभागात बिगरशेती, इनाम जमीन आदी प्रकरणांत बनावट आदेश काढून सुमारे ४० ते ५० कोटींचा घोटाळा ...

महसूलमधील बनावट आदेशप्रकरणी आज बैठक
कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल विभागात बिगरशेती, इनाम जमीन आदी प्रकरणांत बनावट आदेश काढून सुमारे ४० ते ५० कोटींचा घोटाळा झाल्याच्या तक्रारप्रश्नी आज (सोमवारी) बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील करवीर प्रांत कार्यालयात दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या बैठकीला कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर यांनी ही बैठक बोलावली आहे.
कोल्हापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात सन २०१२ ते २०२०पर्यंत महसूल विभागातर्फे बिगरशेती आदेश, गुंठेवारी आदेश, वर्ग २ चे आदेश, देवस्थान जमिनीचे आदेश अशा अनेक प्रकारचे बनावट आदेश निघाले आहेत, असे आरोप करून याची चौकशी करण्याची मागणी कृती समितीने केली होती. हे सर्व आदेश करवीर तहसीलच्या कार्यक्षेत्रातील आहेत, अशीही त्यांची तक्रार आहे. कृती समितीच्या तक्रारीनंतर चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत बनावट आदेशासंबंधीच्या कार्यवाहीची माहिती ते पदाधिकाऱ्यांना देणार आहेत.