ऊसदराबाबत उद्या साखर संकुलात बैठक

By Admin | Updated: November 18, 2015 00:13 IST2015-11-17T23:48:26+5:302015-11-18T00:13:20+5:30

‘एफआरपी’चा प्रश्न : चंद्रकांतदादांची उपस्थिती

Meeting for sugarcane tomorrow in Sugar package | ऊसदराबाबत उद्या साखर संकुलात बैठक

ऊसदराबाबत उद्या साखर संकुलात बैठक

कोल्हापूर : यंदाच्या साखर हंगामातील एकरकमी ‘एफआरपी’बाबत निर्णय घेण्यासाठी उद्या, गुरुवारी साखर संकुलात सकाळी ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व खासगी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. राज्यातील साखर उद्योगाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’वरून पेच निर्माण झाला आहे. साखरेचे बाजारातील दर आजच्या घडीला २४५० पर्यंत आहेत व त्यामुळे बॅँकांची उचल पाहता एकरकमी पैसे देणे अशक्य असल्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
एफआरपी एकरकमीच मिळायला हवी, अशी संघटनेची भूमिका आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत तशी मागणी करून राज्य सरकारला महिन्याची समयसीमा दिली आहे. तोपर्यंत सरकारने यात तोडगा न काढल्यास सुरू असलेले कारखाने बंद पाडण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना हा प्रश्न चर्चेतून सामोपचाराने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनीच सूचना केल्यानुसार चर्चा करण्यासाठी ही पहिली बैठक होत आहे.
या बैठकीला कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, पश्चिम भारत खासगी साखर कारखाना असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, उपाध्यक्ष रोहित पवार व शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साखर आयुक्त विपीन शर्मा बैठकीस उपस्थित असतील. (प्रतिनिधी)

एकरकमी एफआरपी
साखर कारखानदारीस आता नव्याने काही पॅकेज देण्याच्या मन:स्थितीत राज्य अथवा केंद्र सरकार नाही आणि या दोन्ही सरकारनी काहीतरी मदत केल्याशिवाय सद्य:स्थितीत एकरकमी एफआरपी देणेही अडचणीचे आहे.
अशा स्थितीत सरकार या अडचणीतून काय मार्ग काढते, यावरच यंदाची ऊसबिले कशी मिळणार हे ठरणार आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा ऊसदरासाठी साखर कारखाने बंद न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाने यंदा चांगलाच वेग घेतला आहे.

Web Title: Meeting for sugarcane tomorrow in Sugar package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.