राजाराम महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक
By Admin | Updated: July 6, 2015 00:31 IST2015-07-05T23:41:50+5:302015-07-06T00:31:14+5:30
रवींद्र वायकर : राजारामपुरीतील नागरिकांना आश्वासन

राजाराम महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसह इतर प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक बोलावू, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिष्टमंडळाला दिली. राजारामपुरी परिसर तालीम संस्था, तरुण मंडळ व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे वायकर यांची भेट घेऊन महाविद्यालयात प्रश्नांबाबत निवेदन दिले.
राजाराम महाविद्यालय हे १३५ वर्षांचे जुने आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता व शिस्त पाहता गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रवेशासाठी खूप गर्दी होत आहे; पण येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. इमारतीची कमतरता आहे, चार इमारती आहेत; पण त्यापैकी दोन अर्धवट आहेत. इमारतीचे मूळ अंदाजपत्रक ८.४४ कोटींचे असताना केवळ २.६८ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. महाविद्यालयास ‘नॅक’चे मानांकन मिळण्यासाठी काही सुविधांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. राजारामपुरी परिसरातील विद्यार्थ्यांना १० टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. यावर बोलताना राज्यमंत्री वायकर म्हणाले, परिसरातील महाविद्यालय म्हणून प्रवेशाबाबत दुजाभाव करता येणार नाही. महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक घेऊ. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका संगीता देवेकर, प्रा. अनिल घाटगे, नितीन पाटील, अनिल कदम, साजीद खान, फिरोज सौदागर, नामदेव नलवडे, संजय काटकर, रवींद्र देसाई, विशाल पाटील, नितीन मोरे, चंद्रकांत दिंडे, आदी उपस्थित होते.