(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील मोकाट गायी सांभाळण्यासाठी नगरपालिकेने जागा, पाणी व वीज उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या संगोपनासाठी लागणारा इतर खर्च करून सांभाळण्यासाठी तयार असल्याचे गो-सेवा संस्थेने सांगितले. तर शहरातील मुख्य मार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना विविध भागात एकत्रित जागा देऊन मुख्य मार्गावरून त्यांना हलवावे, अशी मागणी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केली. त्यामुळे या बैठकीत पुन्हा मागण्या व उपाययोजनांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ रंगले.
नगरपालिकेच्या सभागृहात मोकाट जनावरे व वाहतूकसंदर्भात बैठक झाली. बैठकीत भटकी कुत्री व डुकरांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याचे ठरले. शहरातील भटक्या गायींची संख्या वाढत आहे. यामुळे वाहतुकीला अडचण व नागरिकांना त्रास होत असल्यासंदर्भात नगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी यापूर्वीही एक बैठक झाली होती.
बैठकीत शिवराणा युथ फोर्स, गुरुदेव सेवा बहुउद्देशीय मंडळ, लक्ष्मीनारायण गो-सेवा संस्था, यश ॲनिमल वेल्फेअर फौंडेशन, आदींनी विविध मागण्या केल्या, तर वाहतूक शाखेच्यावतीने शहरात आवश्यक ठिकाणी फलक लावणे, पट्टे मारणे, सिग्नल दुरुस्ती, आदी मागण्या केल्या.
बैठकीत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी याबाबत नियोजन व विकास समितीसमोर प्रस्ताव ठेवून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका पाटील, गावभागचे निरीक्षक गजेंद्र लोहार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगरसेवक प्रकाश मोरबाळे, राजू बोंद्रे, मिश्रीलाल जाजू, आदींसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
(फोटो ओळी) २९०१२०२१-आयसीएच-०५ इचलकरंजी नगरपालिकेच्या सभागृहात मोकाट जनावरे व वाहतूकसंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी अडचणी मांडल्या. यावेळी प्रकाश मोरबाळे, गजेंद्र लोहार, तानाजी पोवार, अलका स्वामी, डॉ. सुनीलदत्त संगेवार उपस्थित होते.
(छाया-उत्तम पाटील)