केएमटी कर्मचाऱ्यांचा महापौरांना घेराव
By Admin | Updated: April 14, 2015 01:30 IST2015-04-14T01:30:53+5:302015-04-14T01:30:53+5:30
थकीत पगाराची मागणी : चर्चेअंती सकारात्मक तोडगा; उद्यापासून टप्प्याटप्प्याने होणार पगार

केएमटी कर्मचाऱ्यांचा महापौरांना घेराव
कोल्हापूर : मागील दोन महिन्यांचा थकीत पगार द्या, अन्यथा कुटुंबासह महापालिकेच्या चौकात ठिय्या मारू, असा सज्जड दम सोमवारी केएमटी कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांना दिला. पगार भागविण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीवेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. बुधवारपासून १० मेपर्यंत टप्प्याटप्प्याने थकीत वेतन भागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर कर्मचारी मागे हटले.
केएमटीच्या कायम ६५० व रोजंदारीवरील ४४० अशा सर्वच कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा पगार थकला आहे. महापालिक ा प्रशासनाने अर्थसंकल्पात केएमटीला पगारासाठी साडेतीन कोटी रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, महासभेतील ठरावावर महापौर तृप्ती माळवी यांची स्वाक्षरी न झाल्याने पैसे केएमटीला मिळाले नाहीत. पगार नसल्याने चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट महापौर दालनाकडे मोर्चा वळविला. पगाराची जोडणी करण्यासाठी आयोजित बैठकीसाठी महापौर दालनात जाणाऱ्या अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे पगार कधी मिळणार, अशी विचारणा कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी ‘वेतन मिळालेच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या. सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय महापालिकेतून हलणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला.
फेबु्रवारी व मार्च महिन्यांच्या थकलेल्या पगारासाठी बुधवारपासून (दि. १५) महापालिका दररोज १० लाख रुपये केएमटीला देईल. त्यामुळे २७ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार मिळेल. यानंतर १० मेपर्यंत महापालिका पुन्हा ५० लाख रुपये देईल. यातून मार्च महिन्याचा थकीत पगार भागविणे सोपे होईल, असे बैठकीत ठरले.
मात्र, मागील आठवड्यात स्थायी समिती सभापती आदिल फरास व परिवहन सभापती अजित पोवार यांनी २० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेचा निर्णय मागे घेतला. गतवेळीप्रमाणे फसवणूक झाल्यास सर्व कुटुंबासह महापालिकेच्या दारात ठिय्या मांडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये पगार केला जाईल, काळजी करू नका’ असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिल्यानंतरच कर्मचारी माघारी फिरले. (प्रतिनिधी)