हत्तींच्या बंदोबस्ताबाबत कोल्हापुरात शुक्रवारी बैठक
By Admin | Updated: November 12, 2014 00:54 IST2014-11-12T00:50:53+5:302014-11-12T00:54:06+5:30
सर्जन भगत उपस्थित राहणार

हत्तींच्या बंदोबस्ताबाबत कोल्हापुरात शुक्रवारी बैठक
कोल्हापूर : हत्तींच्या बंदोबस्तासाठी स्थापन करण्यात आलेली वन्यहत्तींचे भ्रमण राज्यस्तरीय समिती (कॉरिडॉर कमिटी) शुक्रवार (दि. १४)पासून तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांची बैठक होणार आहे.
बैठकीला नागपूर वन्यजीव मुख्य वनसंरक्षक तथा समितीचे अध्यक्ष सर्जन भगत यांच्यासह मुंबई येथील वन्यजीव कार्यालयाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्णातील चंदगड, आजऱ्यासह सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कुडाळ या जंगल भागात हत्तींचा उपद्रव जास्त आहे. त्यामुळे या परिसरातील पिकांचे नुकसान होते तसेच ये-जा मार्ग निश्चित नसल्यामुळे काहींना प्राण गमवावे लागले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही समिती येणार आहे. बैठकीला तालुक्यांच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येणार आहे. यावेळी हत्तींचा उपद्रव कशा प्रकारे होतो, त्याला अटकाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यावर चर्चा होणार आहे. नागपूरचे अप्पर वनसंरक्षक यांना याबाबतचा भगत अहवाल देणार आहेत. हा अहवाल ते राज्य शासनाकडे सादर करणार आहेत.
दरम्यान, शनिवार (दि. १५) व रविवारी (दि. १६) समिती हत्ती भ्रमण करीत असलेल्या परिसराचा दौरा करणार आहे. दौऱ्यानंतर ही समिती पुण्याकडे रवाना होणार आहे.